अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील तरडगाव फाटा येथे विक्रीसाठी नेला जात असलेला सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 3 लाख 46 हजार 475 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील एक जण पसार झाला आहे.
खर्डा पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवरून दोन इसम गांजा विक्रीसाठी तरडगाव फाट्याच्या दिशेने येणार आहेत, अशी माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली. ही माहिती वरिष्ठांना कळवून एलसीबी व खर्डा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला. तरडगाव फाट्यावर संशयित दुचाकी आढळताच पोलिसांनी तिला थांबवून झडती घेतली. यावेळी दुचाकीवरील गोणीमध्ये उग्र वास येणारा हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे व बिया असलेला गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी सचिन नवनाथ गायकवाड (वय 25, रा. पिंपरखेड, ता. जामखेड), सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे (वय 23, रा. खर्डा, ता. जामखेड) यांना अटक केली आहे. त्यांनी हा गांजा सुभम घुंगरे (रा. माहीजळगाव, ता. कर्जत) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. तो सध्या पसार आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे अडीच लाखांचा 9.854 किलो गांजा, दोन मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी असा एकूण तीन लाख 46 हजार 475 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.




