अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 जूनपर्यंत आहे. सोमवारपासून अर्जविक्री सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत 13 इच्छुकांनी एकूण 22 अर्ज नेले, पण अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. पहिल्या दिवशी 9 इच्छुकांनी 16 अर्ज नेले होते. दुसर्या दिवशी आणखी 4 जणांनी 6 अर्ज नेले. उमेदवारी नेलेल्यामध्ये एकही मोठे नाव नसून हौसेखातर उमेदवारी अर्ज नेले असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत आकडे जुळणार नसल्याने महाविकास आघाडीचे अवसान गळाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी दोन दिवसात 13 इच्छुकांनी 22 अर्ज नेलेले असून यातील किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, महायुतीमधील एकट्या भाजपकडे 207 मतदार असून राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गटाकडे 60, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे 47 असे संख्या बळ असून 461 पैकी महायुतीमधील प्रमुख पक्षांचे संख्या बळ हे 310 च्या पुढे जात आहे. तसेच राहुरीच्या तनपुरे गटाचे 20 सदस्य यात सामिल झाल्यास विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय सुकर होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत आपला आकडा जुळत नसल्याचा अंदाज आल्याने सध्या महाविकास आघाडीच्या गोटात शांतता दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे याबाबत विचारणा केली असता आपण या निवडणुकीसाठी सध्या तरी इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे नगरची विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस 31, शिवसेना ठाकरे गट 6, राष्ट्रवादी तुतारी गटाकडे 31 असे संख्याबळ दिसत आहे. मंगळवारी दाखल अर्जात अनिल दशरथ तुपे श्रीगोंदा (3), प्रविण लक्ष्मण लोखंडे श्रीगोंदा (1), अंकूश रंगनाथ काळे नेवासा (1) आणि ज्ञानदेव पाडळे नेवासा (1) यांचा समावेश आहे.
तगडा उमेदवार आणि ‘टोकण’कडे लक्ष
विधान परिषद निवडणुकीत हात सैल करून खर्च करणार्या उमेदवार उभा राहावा, अशी जिल्हा भरातील उमेदवारांची मागणी आहे. या निवडणुकीत तगडा उमेदवार उभा राहिल्या चांगले टोकण मिळले, अशी आशा मतदारांना आहे. मात्र, ही निवडणूक एकतर्फी झाल्यास उमेदवारांची मात्र निराशा होणार आहे.
नगरची जागा भाजपकडे ?
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 12-5-2 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामध्ये, भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसून तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत. मात्र, भाजपने 12 जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची यादीही निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी 48 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या महायुतीच्या फॉर्म्युल्यानूसार नगरची जागा भाजपकडे गेल्याचे सांगण्यात आले.




