लोणी (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा दर्शन दिले असून, रविवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोणी बुद्रुक येथील बेंद वस्ती भागात ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंद वस्ती भागातील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र विखे यांच्या राहत्या घराजवळ पशुधनासाठी गोठा आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने एका शेळीचा जागीच फडशा पाडला, तर दुसऱ्या शेळीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. इतकेच नव्हे, तर पळून जाताना बिबट्याने एक बोकडही आपल्यासोबत नेले. या दुर्दैवी घटनेत विखे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोणी परिसरात बिबट्यांचा वावर कमी झाल्याचे चित्र होते. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यामुळे उसाची मोठी पिके आता शेतात उरलेली नाहीत. त्यामुळे बिबट्यांनी आपला मोर्चा इतरत्र वळवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, सध्या शेतात असलेले मकाचे पीक, गिन्नी गवत आणि काही प्रमाणात असलेल्या आडसाली उसाचा आश्रय घेऊन काही बिबटे अद्याप याच परिसरात वास्तव्य करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
परिसरात बऱ्याच दिवसांनंतर बिबट्याचा हल्ला झाल्याने पशुपालक आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. उसाची पिके नसल्याने बिबटे आता भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीजवळ असलेल्या गोठ्यांकडे वळू लागले आहेत. यामुळे केवळ पशुधनालाच नव्हे, तर मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचे सावट असून, बाधितांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. पीडित शेतकरी दत्तात्रय विखे आणि बेंद वस्तीतील नागरिकांनी वन विभागाकडे या भागात तातडीने पिंजरा लावण्याची विनंती केली आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून वन विभागाने जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




