Friday, May 3, 2024
Homeब्लॉगतिसर्‍या लाटेचे वास्तव स्वीकारु या!

तिसर्‍या लाटेचे वास्तव स्वीकारु या!

भारतात करोनाची तिसरी लाट येणार हे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, ती केव्हा येईल हे सांगणे अवघड आहे. जर लोकांनी मास्क वापरणे, एकमेकांपासून अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे यांसारखे कोविडकालीन नियम पाळले तर कदाचित ही लाट उशिरा येईल. या दरम्यानच्या काळात लसीकरणाचा वेग वाढल्यास तिसरी लाट आणखी उशिराने येईल. एवढेच नव्हे तर कोविड-19 च्या लाटेची गंभीरताही कमी होईल. परंतु सध्या आपण विपरितच चित्र पाहत आहोत. सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. अशीच गर्दी दुसरी लाट येण्याच्या आधीही दिसून आली होती. असेच चित्र यावेळीही कायम राहिले तर तिसरी लाट लवकरच येईल हे नक्की. म्हणूनच आपण कायम काळजी घेणे आवश्यक आहे.

जर आपण योग्य ती काळजी घेत राहिलो आणि लसीकरणाचा वेग आणखी वाढला तर कदाचित येणारी तिसरी लाट खूप कमी दिवस टिकेल. त्याचे कारण असे की, जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा भारतातील 78 टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज् तयार नव्हत्या आणि संसर्गाची शक्यताही होती. दुसर्‍या लाटेनंतर भारताच्या लोकसंख्येपैकी 60 ते 70 टक्के भाग संसर्गाच्या विळख्यात सापडला. यात दोन प्रकारच्या लोकांचा समावेश होता. एक प्रकार अशा लोकांचा होता ज्यांच्यात कोविडची लक्षणे दिसून आली. दुसरा प्रकार अशा लोकांचा होता, ज्यांच्यात लक्षणेच दिसली नाहीत. एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक हिस्सा जोखमीतून बाहेर पडला आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, विषाणूच्या संसर्गाची जोखीम असलेला लोकसंख्येचा हिस्सा खूप कमी राहिला आहे. भारताने लसीकरणाचा वेग वाढविला तर जोखीम असलेला 40 टक्के हिस्साही कमी होऊ शकतो. जास्तीत जास्त लसीकरण म्हणजे तिसर्‍या लाटेचा कमीत कमी धोका!

- Advertisement -

परंतु संसर्गाबाबत काही अज्ञात घटक जाणून घेणे अजूनही अवघड आहे. पहिला म्हणजे, आपली रोगप्रतिकार क्षमता किती दिवस कार्यरत राहील, हे आपल्याला माहीत नाही. दुसरा प्रश्‍न असा की, तिसरी लाट विषाणूच्या नव्या व्हेरिएन्टमुळे उसळणार का? नवीन व्हेरिएन्ट शरीरात निर्माण झालेल्या रोगप्रतिकार क्षमतेला दाद देईल की नाही हाही प्रश्‍न आहे. तात्पर्य, पूर्वी बाधित झालेले लोकही नव्या विषाणूमुळे बाधित होऊ शकतात की नाही, हे माहीत नाही. परंतु आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार डेल्टा आणि डेल्टा प्लस या दोन नव्या व्हेरिएन्टमध्ये फारसा फरक नाही. डेल्टा प्लस हे डेल्टाचेच बदललेले रूप आहे. डेल्टा व्हेरिएन्टची सर्व लक्षणे आणि वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहेत. तो अतिशय वेगाने पसरतो आणि रोगप्रतिकार शक्ती तयार झाली असेल, तरी तिला तो जुमानत नाही, हेही ठाऊक आहे. याच गोष्टी डेल्टा प्लसबाबतही अनुभवास येतील. दोन्ही विषाणूंमध्ये असलेला एकमेव फरक आपल्याला प्रारंभिक संकेतांवरून दिसून येतो तो असा, की डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या विरोधात मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार कमी परिणामकारक आहेत. भारतात एप्रिल आणि मे महिन्यात आलेली दुसरी लाट डेल्टा विषाणूमुळे आल्याचे पुरावे आहेत. डेल्टा व्हेरिएन्टचा भारतासह जगभरात अधिक वेगाने फैलाव झाला याचेही पुरावे आहेत आणि आता त्याच मार्गाने डेल्टा प्लस व्हेरिएन्टची वाटचाल सुरू आहे.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, मार्च महिन्यापर्यंत भारतात अल्फा व्हेरिएन्ट फैलावत होता आणि चर्चेतही तोच होता; मात्र एकाएकी डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने पसरू लागला आणि एप्रिल, मे महिन्यात त्याने हाहाकार उडवून दिला होता. भारत सरकारने जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग वाढविला पाहिजे आणि नव्याने निर्माण होत असलेल्या सर्व व्हेरिएन्ट्सवर बारकाईने नजर ठेवली पाहिजेे. अर्थात, व्हेरिएन्ट कोणताही असला तरी संसर्ग रोखण्याचे मार्ग बदलणार नाहीत.

मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लोकांमध्ये तसेच माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की, तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक असू शकेल. परंतु अशा सर्व बातम्या निराधार होत्या. तिसर्‍या आणि त्यानंतरच्या कोणत्याही लाटेत लहान मुलांना सध्या आहे त्यापेक्षा अधिक धोका नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोविड-19 च्या संसर्गाचा धोका सर्व वयोगटातील लोकांना एकसारखाच असतो आणि मुलांना या आजाराचा विळखा पडण्याचा धोका तसा कमीच असतो. मुलांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींना या आजाराचा धोका दहा ते वीस पट अधिक असतो.

तिसरी लाट येणार हे वास्तव आहे आणि त्यामुळे पहिल्यापासूनच लाटेशी झुंज देण्याची तयारी ठेवणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. धोरणकर्त्यांनी म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी आणि प्रशासनाने, तांत्रिक तज्ज्ञांनी म्हणजे वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील व्यक्तींनी सर्व समुदायांशी समन्वय राखून सक्रिय राहिल्यास लाटेला तोंड देण्याची तयारी करता येते. यापैकी प्रत्येक समाजघटकाला आपापले योगदान द्यावे लागेल आणि तसे झाले तरच भारताला संसर्गापासून सुटका मिळू शकेल. सर्व स्तरांवरील म्हणजे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील धोरणकर्त्यांनी योजना तयार करून आरोग्य प्रणाली मजबूत करायला हवी. तांत्रिक तज्ज्ञांनी आकडेवारीचे विश्‍लेषण करून योग्य मार्गदर्शन करायला हवे. समाजाच्या स्तरावर कोविडशी दोन हात करण्यासाठी नियमांचे पालन होईल, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. यापैकी प्रत्येक समाजघटकाने आपापली जबाबदारी योग्य प्रकारे बजावली तर भारत या विषाणूपासून यशस्वीरीत्या सुटका करून घेऊ शकेल.

याबरोबरच अन्य काही बाबी केल्या जाणे अपेक्षित आहे. पहिली गोष्ट अशी की, सरकार आणि तांत्रिक तज्ज्ञ मंडळींनी पहिल्या दोन लाटांमधून मिळालेले धडे लक्षात ठेवून योग्य रीतीने नियोजन करायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे, राज्यांमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विस्तृत योजना तयार करायला हवी आणि ती कालबद्ध तसेच वित्तपोषित असायला हवी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यांनी अन्य राज्यांत राबविलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या उपाययोजना राबवायला हव्यात. चौथी बाब अशी की, चाचण्या आणि उपचार सुविधा चांगल्या करण्यास प्राधान्य द्यायला हवे. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यावर भर दिला गेला पाहिजे.

पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी की, राज्यांनी जिनोम सिक्वेन्सिंग वाढवायला हवे आणि कोविड-19 संबंधी आकडेवारी आणि रुग्णसंख्या यांचा डाटा विस्तृत प्रमाणात तयार केला पाहिजे तसेच तो व्यवस्थित जपून ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. नव्याने तयार होत असलेल्या व्हेरिएन्ट्सवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. सहावी गोष्ट अशी की, राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. विशेषतः लसीकरणाबाबत उदासीन असलेल्या समाजघटकांना लस घेण्यासाठी राजी करायला हवे. सातवी गोष्ट, सरकारांनी जनसंपर्क मोहिमा राबविल्या पाहिजेत आणि त्यातून शास्त्रीय तसेच खरीखुरी माहिती समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवायला पाहिजे. कोविड काळात पाळावयाचे नियम वारंवार लोकांना सांगून ते पाळण्यासाठी प्रेरित करणे हा या जनसंपर्क मोहिमांचा हेतू असायला हवा. लस घेणे किती आवश्यक आहे, हेही अशा मोहिमांमधून सांगितले गेले पाहिजे. त्याचबरोबर सरकारांनी कोविडव्यतिरिक्त अन्य आरोग्य सुविधाही सुरू ठेवल्या पाहिजेत. कोविडोत्तर व्याधी किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा लोकांना मिळतील, याची खबरदारी घेतली पाहिजे.

करोनाच्या महामारीशी मुकाबला करण्यासाठी आज संपूर्ण जग एकवटले आहे. जोपर्यंत या महामारीचा खातमा होत नाही, तोपर्यंत आपण सुुटकेचा निःश्‍वास सोडू शकत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने म्हणजेच सामान्य नागरिकांनी, धोरणकर्त्यांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी या लढाईत आपापले योगदान द्यायलाच हवे. असे झाल्यास ही लढाई आपण जिंकू याची खात्री आहे.

(डॉ. लहरीया हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असून ‘टिल वी विन : इंडियाज फाईट अगेन्स्ट द कोविड 19 पँडेमिक’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या