Thursday, May 2, 2024
Homeधुळेकाकाच्या खुनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

काकाच्या खुनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप

धुळे । प्रतिनिधी dhule

शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे क्षुल्लक कारणावरून काकाचा खून केल्याप्रकरणी पुतण्या सुर्यकांत अभिमन पाटील यास जन्मठेपीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे.जे.बेग यांनी ठोठावली.

- Advertisement -

मयत मुरलीधर धोंडू पाटील (रा.कलमाडी) हे दि.23 जुलै 2015 रोजी सकाळी 8.30 ते 8.45 वाजेच्या सुमारास पायी शेतात जात होते. तेव्हा विहिरीत पाण्याची मोटार का बसविली, या कारणावरून त्यांचा पुतण्या सुर्यकांत अभिमण पाटील याने दुचाकीवर भरधाव वेगात पाठीमागून येवून मुरलीधर पाटील यांना धडक देवून खाली पाडले. त्यानंतर धारदार चाकुने पोटात वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर मुरलीधर पाटील यांना धुळे शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

उपचारादरम्यान दि. 29 रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रथम सुर्यकांत पाटीलसह तीन जणांवर भादंवि 326 व इतर कलमान्वये नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढीव कलम 302 हे लावण्यात आले. तपासाधिकारी यांनी तपास करुन आरोपींविरुध्द भादंवि302 व इतर कलमान्वये दोषारोपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे.जे.बेग यांच्या न्यायालयात सुरू झाले. सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदारांची साक्ष अति. सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी तपासल्या. त्यात घटनास्थळाचे पंच साक्षीदार, उपचार करणारे डॉ.मिलींद पाटील, शवविच्छेदन करणारे डॉ.आर.के.गढरी, त्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार स्वत: फिर्यादी व आरोपीचे काका देवमन व्यंकट पाटील, तसेच तपासाधिकारी एपीआय बी.एम.काळे यांची साक्ष ग्राहय धरण्यात आली.

खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करतांना अ‍ॅड. गणेश पाटील यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषनाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद केला.

जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.जे.जे.बेग यांनी खटल्यातील असलेल्या संपुर्ण पुराव्यांच्या व सर्वोच्च न्यायालयाने, दिलेले निकालांचा सांगोपांग विचार करुन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच 10 हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास दोन वर्ष सक्तमजूरीचा शिक्षेचा आदेश केला. फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. गणेश पाटील यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या