Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यालाईनमन कृतज्ञता दिनविशेष : नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे

लाईनमन कृतज्ञता दिनविशेष : नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ऊन, वारा, पाऊस, वादळ याची पर्वा न करता लोकांच्या घरात वीजपुरवठा अखंडित राहावा, याकरिता सतत कार्यरत असलेल्या जनमित्र म्हणजेच लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त हा दिवस.केंद्र शासनातर्फे (दि.4 मार्च) देशभरात लाईनमन दिन साजरा करण्याकरिता आस्थापनांना सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणमध्ये देखील लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लाईनमनचे काम म्हणजे फोन आल्यानंतर बिघाड झालेली यंत्रणा तत्काळ दुरुस्त करून लोकांना सेवा देणे इतकेच राहिले नसून थकीत वीजबिल वसुली असो की वीजजोडणी असो, त्यांना सदैव तत्पर राहून हे कार्य करावे लागते. नाशिक शहरातील महावितरण कंपनीच्या अशाच काही लाईनमनशी दै. ‘देशदूत’ने संवाद साधून त्यांचे चांगले वाईट अनुभव जाणून घेतले.

गेल्या 18 वर्षांपासून महावितरण कंपनीत कार्यरत असून आमचे काही सहकारी वीजपुरवठा खंडित झाल्याने काम करण्यासाठी जात असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला होता. त्यानंतर अधिकारी व संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम राबविला. त्याचा आज चांगला फायदा होत आहे.

– महेश कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ,नाशिक शहर 2 विभाग

ज्या कुणाचे काम लवकर झाले तो धन्यवाद म्हणतो, मात्र एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला तर तेथील नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. वीजबिलाची थकीत रक्कम वसुलीसाठी जात असतांना बर्‍याचदा वाईट अनुभव येत असतात. बरेच नागरिक वीजबिल भरण्यासाठी नाराजी दाखवतात. याचा मनःस्ताप आम्हाला सहन करावा लागतो.

– बाळासाहेब गोसावी, प्रिन्सिपल टेक्निनशियन (पॉवर हाऊस कक्ष 2),नाशिकरोड

काम करत असताना एकदा मोठा अपघात झाला होता. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने वापरात येणारी सर्व साहित्य आम्ही वापरल्याने सुदैवाने त्याठिकाणी काही हानी झाली नव्हती. थकीत वीजबिल वसुलीसाठी जात असताना आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. आम्ही 24 तास ग्राहकाला सेवा देत असतो.

– भूषण परदेशी, वरिष्ठ तंत्रज्ञ, एमएसबी कक्ष, सातपूर उपविभाग, नाशिक शहर विभाग-1

प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येत असल्याने चांगले वाईट अनुभव येत असतात. मुदत संपून गेल्यावर वीजबिल भरा, असे सांगण्यासाठी गेलो असता बर्‍याच ठिकाणी वाईट अनुभव येतात. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कुणाचाही फोन आल्यास आम्ही तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असतो.

– प्रवीण राऊत, वरिष्ठ तंत्रज्ञ,डि.जे.पार्क – 1 ,विभाग नाशिक शहर -1

- Advertisment -

ताज्या बातम्या