अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नगर जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 734 पात्र शेतकर्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. तर बँकांनी पाठवलेल्या माहितीमध्ये केवायसी त्रुटी, बंद खाती किंवा व्याजाशी संबंधित त्रुटी असलेल्या खात्यांची पुन्हा पडताळणी सुरू असून साधारण15 ऑगस्टपर्यंत दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे.
या कर्जमाफीत ओटीएसमध्ये दोन लाखांपुढे लाभ घेण्यासाठी 1 मार्च 2027 पर्यंत मुदत राहणार असल्याची माहिती सहकार खात्याकडून देण्यात आली.
राज्यातील शेतकर्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1 हजार 378 गावांमधील शेतकर्यांचा समावेश आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 16 हजार 512 शेतकर्यांचा तर व्यापारी बँकांच्या 16 हजार 222 शेतकर्यांचा समावेश आहे.
या कर्जमुक्ती योजनेत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजीची थकबाकी व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेऊन कमाल 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यात एकवेळ समझोता योजनेत 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्यांसाठी अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाचा लाभ मिळेल. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्या पात्र शेतकर्यांना 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
कर्जमाफीसाठी मयत शेतकर्यांच्या वारसांनी बँकेत वारस नोंद करून कर्ज खाते हस्तांतरित करावे व बँक खात्याशी आधार लिंक करावे. गावपातळीवर प्रसिद्ध झालेली यादी व पोर्टलवरील थकबाकी रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी. 2 लाखांपर्यंतची सवलतीची रक्कम शासनामार्फत माफ केली जाणार असून शेतकर्यांना बँकेत कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. सर्व पात्र शेतकर्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सहकार खात्याने केले आहे.




