Monday, September 7, 2026
HomeनगरAhilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

जिल्हा बँकेच्या 90 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतिक्षा!

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने पात्र 1 लाख 92 हजार शेतकर्‍यांची यादी राज्य सरकारच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या दोन याद्यांमधून एकूण 1 लाख 2 हजार 563 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. मात्र, उर्वरित 90 हजार शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना पुन्हा एकदा अडखळल्याचे चित्र आहे.

कर्जमाफीचा दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये 36 हजार 424 शेतकर्‍यांच्या खात्यावर 348 कोटी 51 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पहिल्या व दुसर्‍या हप्त्याची एकत्रित आकडेवारी पाहता, जिल्हा बँकेचे आतापर्यंत 1 लाख 2 हजार 563 शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्या खात्यावर एकूण 975 कोटी 98 लाख 48 हजार 631 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्राप्त 1 लाख 32 हजार 700 शेतकर्‍यांपैकी 1 लाख 22 हजार 445 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले असून त्याचे प्रमाण 95 टक्के आहे. त्यापैकी आजपर्यंत पहिला आणि दुसरा टप्पा मिळून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 1 लाख 2 हजार 563 शेतकर्‍यांच्या खात्यावर 976 कोटी व राष्ट्रीय व व्यापारी बँकांच्या 12 हजार 652 शेतकर्‍यांच्या खात्यावर 138 कोटी असे एकूण अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 215 शेतकर्‍यांच्या खात्यावर 1 हजार 114 कोटी रुपये जमा झालेले आहेत.

कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 7 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हा बँकेच्या 66 हजार 139 शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला होता. या शेतकर्‍यांच्या खात्यावर 627 कोटी 47 लाख 26 हजार 562 रुपये वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑगस्ट दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला. या हप्त्यात जिल्हा बँकेच्या 36 हजार 424 शेतकर्‍यांचा समावेश होता तर त्यांच्या खात्यावर 348 कोटी 51 लाख रुपये वर्ग करण्यात आले. दोन हप्त्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या एक लाखाच्या पुढे सरकली असली जिह्यात अद्याप एकट्या जिल्हा बँकेच्या 90 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतिक्षा आहे.

आधार प्रमाणिकरण, मयत, अपात्रांची संख्या मोठी?
जिल्ह्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जमाफीच्या यादीत आधार प्रमाणिकरण न झालेल्या, फार्मर आयडी न काढलेले, मयत, कर्जमाफीसाठी पात्र नसणार्‍यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सर्वाधिक तयारी केलेल्या एकट्या जिल्हा बँकेचे 90 हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या तपासणीच्या प्रक्रियेत अडकले असल्याचे सांगण्यात आले. तसेच मयत शेतकर्‍यांच्या वारसांची देखील कागदपत्रांची पुर्तता करून घेण्यात येत असून ती पूूर्ण झाल्यावर त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...