श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) श्रीगोंद्यात स्वबळाचा नारा दिला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. उमेदवार फायनल करताना पक्षातील श्रेष्ठींची दमछाक होणार असून यावर तोडगा काढण्यासाठी आतापासूनच बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. श्रीगोंदा नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी पाचपुते विरोधकांनी वज्रमुठ बांधली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत श्रीगोंदा शहर तसेच सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गटनिहाय इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची समन्वय व विकासाची दृष्टी नजरेसमोर ठेवून श्रीगोंदा शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार्या सक्षम कार्यकर्त्यांची निवड करण्यासाठी नेत्यांवर जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या आहेत. याचा पूर्ण अहवाल तयार करून उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रमुख नेत्यांवर जबाबदार्या देण्यात आल्या आहेत.
श्रीगोंदा शहराची जबाबदारी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्याकडे तर येळपणे, कोळगाव, मांडवगण या तीन जिल्हा परिषद गटात माजी आमदार राहुल जगताप व राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्याकडे तर काष्टी, बेलवंडी व आढळगाव या तीन जिल्हा परिषद गटाची धुरा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, अंतिम निर्णय सर्व नेते एकत्र बसून घेणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी दिली.
तालुक्याचे राजकारण पाहता पाचपुते यांना सक्षम विरोधी पर्याय असणे नेत्यांना गरजेचे असल्याने अनेकांनी यापूर्वीच सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. आता पुढील काही महिन्यांत निवडणूका होणार असून श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याने राज्य आणि केंद्रात महायुती असूनही श्रीगोंद्यात मात्र महायुतीतील पक्ष आमनेसामने लढताना दिसणार आहेत.




