लोणी |वार्ताहर| Loni
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लोणी बुद्रुकचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिराची दानपेटी शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील म्हसोबा महाराज यांची ओळख आहे. वर्षभर लाखो भाविक येथे येऊन दर्शन घेतात आणि यथाशक्ती दैवताच्या पेटीत सढळ हाताने दान देतात.
एकीकडे दान देणारे आहेत, तर दुसरीकडे त्याच दानावर डल्ला मारणारेही आहेत. यापूर्वी दोन वेळा मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद होऊनही पोलिसांना त्यांना शोधण्यात यश आले नाही. निर्ढावलेल्या आरोपींनी शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दानपेटी फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. सकाळी मंदिराचे पुजारी आले असता त्यांना दानपेटी फोडल्याचे लक्षात आले. काही ग्रामस्थांनी कळवल्यानंतर लोणी पोलिसांना माहिती देण्यात आली. सपोनि कैलास वाघ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
गुन्ह्याची पद्धत आणि ग्रामपंचायतमधील सीसीटीव्ही फुटेज यांच्या मदतीने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. सुरेश घमाजी धावणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 325(ड), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला. वारंवार या मंदिरातील दानपेटी फोडली जात असल्याने ग्रामस्थ चिंतीत आहेत. पोलिसांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी त्यांची मागणी आहे.




