हनुमंतगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील पाथरे-कोल्हार रस्त्यावरील जगदंबा माता मंदिर परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांच्या टोळीचा लोणी पोलिसांनी डाव उधळून लावला. पोलिसांची चाहूल लागताच दोन मोटारसायकलींवरून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले तर आणखी एक संशयित घटनास्थळीच पोलिसांच्या ताब्यात आला. टोळीकडून धारदार कोयता, चाकू, लाकडी दांडा, दोरखंड आणि मिरची पावडर असा दरोड्यासाठी सज्ज केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
२६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता पाथरे परिसरातील निर्जन ठिकाणी काही संशयित व्यक्ती संशयास्पदरीत्या एकत्र जमल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. पोलिसांची चाहूल लागताच टोळीतील चौघांनी दोन मोटारसायकलींवरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यांना पकडले. यावेळी आणखी एक संशयित पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये नितीन उर्फ चिनीबाळा जानू भिंगारदिवे (२६, रा. पंचवटी झोपडपट्टी, राहाता) याचा समावेश आहे. त्याच्यासोबत अनिकेत उर्फ मयूर विठ्ठल आल्हाट, सनी मच्छिंद्र नरोडे, रोहित साळवे आणि नाव-पत्ता अद्याप समोर न आलेला आणखी एक साथीदार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
घटनास्थळी पोलिसांनी झडती घेतली असता दरोड्याच्या तयारीचा धक्कादायक पुरावा हाती लागला. सुमारे दोन फूट लांबीचा धारदार कोयता, साडेसहा इंच पात्याचा चाकू, अडीच फूट लाकडी दांडा, तब्बल २० फूट दोरखंड आणि मिरची पावडरचे पाकीट पोलिसांनी जप्त केले. या साहित्यावरून टोळीने नेमका कोणत्या ठिकाणी आणि कोणावर दरोडा टाकण्याचा कट आखला होता, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात संभाव्य दरोड्याची घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी टोळीचा डाव हाणून पाडला. टोळीच्या अन्य साथीदारांचा सहभाग, त्यांचे पूर्वीचे गुन्हे तसेच त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारच्या घटनांना हातभार लावला आहे का, याचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोईटे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१०(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि संभाव्य ठिकाणांची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. ही धडक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, बाबासाहेब सांगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सूर्यभान पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुदनर यांच्या पथकाने केली. जप्त केलेल्या शस्त्रसामग्रीमुळे या टोळीने नेमका कोणता टार्गेट टार्गेट निश्चित केला होता, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तपासातून या कटामागील सूत्रधार आणि टोळीच्या हालचालींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.




