नवी दिल्ली | New Delhi
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) (दि.२९) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १७ भाविकांचा (Devotees) मृत्यू झाला असून ६० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत भाविक गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता सध्या प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय आहे? स्थिती पूर्वपदावर आणण्याकरता आखलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.
यावेळी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, “संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली. तसेच संगम घाटातील घटनेनंतर घटनेची माहिती घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चारवेळा फोन केला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही संपर्क साधला आहे. याशिवाय राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली आहे”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,” परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता उच्चस्तरीय बैठकही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकाही सामील आहेत. सध्या प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे, पण गर्दी वाढली आहे. आखाडा परिषदेतील लोकांशी चर्चा केली. त्यांनी सुरुवातीला भाविकांना स्नान करण्याची परवानगी दिली असून भाविकांची गर्दी ओसरल्यावर साधू, संत स्नान करणार आहेत. काल (२८ जानेवारी) रोजी साडेपाच कोटी भविकांनी महाकुंभ येथे स्नान केले. तर आज सकाळपासून तीन कोटी लोकांनी स्नान केले. पण संगम नोज आणि आखाडा मार्गावर सातत्याने गर्दी वाढत जात आहे. तरीही भाविकांच्या (Devotees) सुविधेकरता प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका, संयमाने वागा, हे आयोजन सर्वांचं आहे”, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
दुर्घटनेमुळे आम्ही दु:खी – महंत रवींद्र पुरी
प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे, आमच्यासोबत हजारो भाविक होते. या दुर्घटनेनंतर आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय आम्ही जनहितार्थ घेतला आहे. मी लोकांना आवाहन करतो की आजच्या ऐवजी वसंत पंचमीला आंघोळीसाठी यावे. अनेक भाविकांना संगम घाटावर पोहोचायचे होते, त्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र आता भाविकांनी पवित्र गंगा जेथे दिसेल तेथे स्नान करावे,” असे त्यांनी म्हटले.