श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथील वेअर हाऊसमध्ये गंगापूरसह श्रीरामपूर तालुक्यातील कापूस व्यापार्यांनी बोगस कापसाच्या गाठी ठेवून इंडियन कमोडिटीज वेअर हाऊस कंपनी व एचडीएफसी बँकेची 5 कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वेअर हाऊस अधिकार्यांसह पाच लोकांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमधील गंगापूर येथील दोन व्यापार्यांसह वेअर हाऊसच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रमुख सूत्रधार फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. महांकाळवाडगाव येथील माजी सरपंचास नाशिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून ताब्यात घेतले असल्याची माहिती नांदगाव पोलिसांनी दिली.

याबाबतची फिर्याद इंडियन कमोडिटीज (वेअर हाऊस) कंपनीचे महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचे हेड ज्ञानेंद्र चतुर्वेदी यांनी नाशिक ग्रामीणच्या नांदगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या कंपनीचे व एचडीएफसी बँकेचे कोलॅटरल मॅनेजमेंटचे अॅग्रीमेंट आहे. सदर करारानुसार आमची कंपनी तारण मालाची संपूर्ण जबाबदारी घेते. कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार बँक कृषी ग्राहकांना कर्ज देते. गोदामातील तारण मालात फसवेगिरी झाल्यास कर्ज परताव्याची जबाबदारी सर्वस्वी कंपनीवर असते. अशोक सदाशिव राऊत (लक्ष्मी व्यंकटेश ट्रेडर्स, तांदुळवाडी, ता. गंगापूर) आणि शिवनारायण बद्रीनारायण मालपाणी (शिवा ट्रेडर्स, गंगापूर) यांनी मंजुषा जोशी यांच्या मालकीचे मल्हारवाडी (नांदगाव) येथील 6 हजार चौरस फूट गोडावून 11 महिने भाडेतत्त्वावर 16 डिसेंबर 2025 रोजी घेतले.
22 डिसेंबर 2025 रोजी एचडीएफसी बँकेने आमच्या कंपनीला या गोडावूनच्या व्यवहाराची माहिती ईमेलद्वारे पाठवली. यानंतर गोडावूनचे व्यवस्थापक अरबाजखान, गुणवत्ता तपासणी व्यवस्थापक सिद्धार्थ अमराव आणि सहव्यवस्थापक रोशन गोन्नाडे या तिघांनी व्यापार्यांबद्दल शिफारस केल्यावरून कंपनीने करार केला. लगेच दि. 24 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत गोदामात कापूस गाठी साठविण्यात आल्या. आणि 6 कोटी 59 लाख रुपयांच्या मालाचे व्हॅल्युएशन या तिघांनी बँकेला दिले. यावरून बँकेने तातडीने 5 कोटी रुपयांचे कर्ज गंगापूरच्या या दोन व्यापार्याना दिले. पुढे 5 डिसेंबर रोजी कंपनीचे ऑडिटर संतोष चांडक यांनी गोदामास भेट देऊन तपासणी केली असता, 90 टक्के कचरा आणि वरून कापसाचा मुलामा असल्याचे लक्षात आले. त्यांच्या तपासणी अहवालानंतर कंपनीस आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले.
कंपनीने तिन्ही व्यापार्यांशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पुढे व्यापारी फोन उचलणे टाळू लागले. दोन व्यापारी व कंपनी गोदामाचे तिघेजण अशा पाच लोकांवर संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल करण्यात आला. हा गुन्हा नांदगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर पुढील तपासाची चक्रे जलदगतीने फिरली आणि प्रारंभी पाच जणांना अटक करण्यात आली. तपासात यातील मास्टरमाईंड श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने नांदगाव पोलिसांनी मोर्चा श्रीरामपूर तालुक्याकडे वळवला. त्यांच्यामार्फत 5 कोटींपैकी 1 कोटी 80 लाख रुपये महांकाळवाडगाव येथील माजी सरपंचांच्या कृषी फर्म खात्यावर टाकण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले.
नाशिक पोलिसांनी त्या माजी सरपंच यांना अटक करून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी ताब्यात आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 61(1), 339, 336, 318, 316(2), 3(5) प्रमाणे अशोक सदाशिव राऊत (रा. तांदुळवाडी, जि- छत्रपती संभाजीनगर), शिवनारायण बद्रीनारायण मालपाणी (वैजापूर), संतोष पाटील (पुर्ण नाव नाही), रोशन गोनांदे, अरबाज खान, सिद्धार्थ अमराव (गोंधवणी, श्रीरामपूर) या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापूस गाठी गोदामात तारण ठेवून प्रथम कोट्यवधी कर्ज, नंतर इन्शुरन्स काढून गोदामास आग लावणे, हा श्रीरामपूर ग्रामीण पॅटर्न आहे. आतापर्यत श्रीरामपूर एमआयडीसी नंतर संगमनेर गोदाम, पुणतांबा गोदामातील कापूस गाठींना आग लावून इन्शुरन्स पॉलिसी उकळण्याचा मोठा फंडा उघड झाला आहे. वरील गोदामातील कृत्रिम आग प्रकरणात फसवणूक करणारे श्रीरामपूर तालुक्यातील तेच ते नावे निष्पन्न झाले होते. संबंधित अधिकार्यांना हाताशी धरून प्रकरणे दडपण्यात आली. मात्र, पुन्हा असा प्रयोग करणार्या कापूस व्यापार्यास काळया यादीत टाकून अहिल्यानगर, संभाजीनगर जिल्ह्यात कुणी गोदाम अथवा बँका कर्ज देण्यास स्पष्ट नकार देत असल्याने. याप्रकरणाची पुनरावृत्ती करणार्या सूत्रधाराने या कंपनीचा कोलॅटरल व्यवस्थापक सिध्दार्थ अमराव (रा.गोंधवणी, नवीन गुरूकुल, श्रीरामपूर) याच्याशी ओळख करून नांदगाव गाठले.




