Sunday, June 14, 2026
HomeनगरShrirampur : महानुभाव पंथातील साधू-संतांची कोट्यवधींची फसवणूक

Shrirampur : महानुभाव पंथातील साधू-संतांची कोट्यवधींची फसवणूक

श्रीरामपूर तालुक्यामधील ‘बाबा’ आपल्या मानस पुत्रासह पसार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अध्यात्मिक विश्वासाचा गैरफायदा घेत, कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून, महानुभाव पंथातील साधू-संत, अनुयायी आणि सामान्य भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील महानुभाव पंथामधील एक साधू, त्याचा मानसपुत्र व इतर साथीदारांनी हा कथित घोटाळा केल्याचा आरोप असून, प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीची रक्कम सुमारे 500 ते 600 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महानुभाव पंथातील साधू-संत व अनुयायांचा विश्वास संपादन करून गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल असे, आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपींकडून आज देतो, उद्या देतो अशी टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर मुख्य आरोपी आपल्या साथीदारांसह पसार झाल्याने संतापाची लाट पसरली आहे.

पीडित साधू-संत आणि अनुयायांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, हा केवळ आर्थिक घोटाळा नसून अध्यात्मावर श्रद्धा ठेवणार्‍या नागरिकांच्या भावनांशी केलेला विश्वासघात आहे. या प्रकारामुळे अध्यात्मिक क्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करून आरोपींना अटक करावी, तसेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी राज्यभरातील साधू-संत व अनुयायांनी केली आहे. प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यास श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडेही पंथीय भाविकांनी न्याय मागितल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद !
या साधूच्या अलिशान बंगल्यावर काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी धाड टाकून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या होत्या. एवढेच नव्हे तर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी स्वतः फिर्यादी होत या दोघांविरुध्द गुन्हाही दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधिक्षक व तालुका पोलीस संयुक्तीकपणे करीत होते. पोलिसांनी अनेकदा या बाबाची ‘कसून’ चौकशी केली. बाबाला अटक मात्र झाली नाही. आता बाबा व त्यांचे मानसपुत्र दोघेही गायब झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...