Friday, June 19, 2026
HomeराजकीयAshok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ; विरोधक आक्रमक,...

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ; विरोधक आक्रमक, भास्कर जाधवांनी काढली मंत्र्यांची लाज

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात सध्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या व अघोरी कृत्यांच्या प्रकरणाने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. भोंदू खरातसोबतचे लागेबांधे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, यामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी अडचण झाली आहे.

- Advertisement -

सोमवारी (२३ मार्च) विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरात प्रकरणावर जोरदार चर्चा घडवून आणली. रुपाली चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत होत्या आणि त्यांची पाद्यपूजा करतानाचे तसेच खरातवर छत्री धरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. केवळ एका राजीनाम्याने हे प्रकरण शांत होणार नाही, तर खरातला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

या चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली. महाराष्ट्राला संतांची आणि सुधारकांची थोर परंपरा असताना, सत्तेत बसलेली माणसे अशा भोंदू बाबांच्या पाया पडतात, हे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले. भास्कर जाधव यांनी थेट मंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “या भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दांत सरकारची लाज काढली.

अशोक खरात याच्यावर नाशिकमध्ये बलात्काराचे आणि गर्भपाताचे गंभीर गुन्हे दाखल झाले असून, एसआयटी (SIT) कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. खरातने ‘ओष्णोजल’ आणि ‘भविष्य’ सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक मोठे नेते आणि अधिकारी सामील असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत विधिमंडळ चालू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्‍या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या...