मुंबई । Mumbai
राज्यातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. आगामी राजकीय समीकरणे आणि पक्ष विस्ताराचा विचार करून या नवीन निवडींमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांना बढती देण्यात आली असून अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या नवीन टीमची माहिती दिली. निवडणुका पार पडल्यानंतर ही भाकरी फिरवण्याचे संकेत पक्षाने आधीच दिले होते. “पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असून, ज्यांना सध्याच्या यादीत स्थान मिळालेले नाही, त्यांना आगामी काळात संघटनेच्या इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल,” असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले. शिस्तबद्ध संघटन आणि आक्रमक प्रचार ही भाजपची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न या निवडींमधून दिसून येत आहे.
या नवीन कार्यकारिणीत भाजपने एकूण १२ उपाध्यक्ष नियुक्त केले आहेत, ज्यात माजी खासदार आणि अनुभवी आमदारांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतुल काळसेकर, डॉ. भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची आता पदोन्नती करून त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
संघटनेचा कणा समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदासाठी सहा नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर हे आता प्रदेश सरचिटणीस म्हणून कामाची धुरा सांभाळतील. तर, चिटणीस पदावर पक्षाने मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांसारख्या तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना स्थान देऊन संघटनेत नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला आहे.
युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिक यांची ‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महिला आघाडीचे नेतृत्व पुन्हा एकदा आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडेच सोपवण्यात आले असून, त्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दर्शवला आहे. ओबीसी कार्ड खेळताना पक्षाने योगेश टिळेकर यांची ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच, मुंबईचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची (तिजोरीची) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकारणात या निवडीचे पडसाद उमटले आहेत. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना थेट प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांनी केलेल्या पक्षविस्ताराच्या कामाची ही पोचपावती असल्याचे मानले जात आहे. विखे पाटील यांनीही या नवीन जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त करत राज्यभर पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, पक्षाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्य प्रवक्ता’ पदावर आता नवनाथ बन यांची वर्णी लागली आहे.





