मुबंई | Mumbai
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Seassion) सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात काही घोषणा केल्या आहेत.
यावेळी ते म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प (Budget) २०४७ च्या विकासाकडे जाणारा असून, हा केवळ जमाखर्च नाही तर विकसीत महाराष्ट्राचा लेखाजोखा आहे. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारता येणार आहे अजितदादांच्या नावे ‘गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित करतो, असे फडणवीस यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. संत गाडगेबाबांचे १५० वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जनत आणि संवर्धन करू, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले.





