मुबंई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांसह नवीन योजनांची घोषणा केली आहे.
विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली.
यावेळी ते म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार आहे. याकरिता २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजनेची नव्याने घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला.
मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये ४९० किलोमीटरच्या मेट्रोचं काम हाती
२०३० पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. याशिवाय अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई विकसित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये ४९० किलोमीटरच्या मेट्रोचं काम हाती घेण्यात आले. त्य़ापैकी १७३ किमीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. आगामी वर्षात आणखी ५० किमीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या?
यावेळी फडणवीस म्हणाले की, ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच १० ते १५ पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाईल.२ वर्षांत महाराष्ट्र शेती नैसर्गिक अभियान या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौथ्या मुंबईसाठी पायाभूत सुविधा
मुंबई व पुण्याला ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे.४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात तिसरी चित्रनगरी स्थापन करणार
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यातील नवरगा तालुक्यातील रामटेक येथे विकसित करण्यात येणार असल्याचे म्हटले. तसेच नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल, असेही ते म्हणाले.




