नाशिक | प्रतिनिधी Nashik
आज नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकार मधील एकूण ३९ मंत्र्याना शपथ देण्यात आली यात ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याला तीन मंत्री लाभले असून यात माजी मंत्रे आमदार दादा भुसे यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दादा भुसे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून झाली आहे. भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी मालेगाव येथे झाला. त्यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. भुसे यांचे शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर इथपर्यंत झाले असून त्यांनी पंधरा वर्ष जलसंपदा विभागात शाखा अभियंता म्हणून काम केले. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकीय क्षेत्राकडे वळाले.
धर्मवीर आनंदजी दिघे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व समाजकार्यावर प्रभावीत होऊन मालेगांव येथे ‘जाणता राजा’ मंडळाच्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात करत ते नंतर शिवसेनेत सक्रीय झाले. यावेळी भुसे यांनी सुरुवातीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून कामकाज सुरू केले. त्यानंतर 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. भुसे यांनी 2004 साली मालेगाव बाह्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर माजी राज्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे चिरंजीव प्रशांत हिरे यांच्या कडवे आव्हान होते. त्यांचा ९ हजार १७ मतांनी पराभव करून दादा भुसे विधानसभेत पोहोचले होते. त्यावेळी भुसे यांना 68 हजार 69 इतकी मते मिळाली होती. तर २००९ साली भुसे यांनी पुन्हा एकदा प्रशांत हिरे यांचा 30 हजार 64 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भुसे यांना पक्ष ९५,१३७ मते मिळाली होती. तसेच २०१४ भुसे यांना८२ हजार ०९३ इतकी मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या पवन ठाकरे यांचा ३७ हजार ४२१ मतांनी पराभव करत विजय मिळविला होता. तर २०१९ साली १ लाख २१ हजार २५२ की मोठे मताधिक्य घेत काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा ४७ हजार ६८४ मतांनी पराभव करत विजय मिळविला होता.
तर यंदाच्या २०२४ निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वय हिरे यांचा तब्बल १,लाख ०६ हजार ००५ मतांनी पराभव करत विजय मिळविला. या निवडणुकीत भुसे यांना १ लाख ५७ हजार ४०५ इतकी मते मिळाली आहेत. भुसे हे सलग पाच टर्म मालेगाव बाह्य या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्याचप्रमाणे आ. भुसे यांनी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री, बंदरे व खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम), रोजगार हमी योजना व फलोत्पादन यासारखे कॅबिनेट तर सहकार आणि ग्रामविकास भागाचे राज्यमंत्रीपद भूषविले आहे. तसेच नाशिक, धुळे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषविले आहे.
भुसे सामाजिक कार्यात अग्रेसर
वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. दगडू बयाजी भुसे यांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन त्यांनी सतत सक्रीय सहभाग घेत अनेक गरजुंना रक्तदान, गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफ़त वह्या व वॉटरबॅग वाटप, तसेच ना नफा ना तोटा तत्वावर वह्या वाटप, गोर-गरीब जनतेसाठी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा, मालेगांव सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन, आदिवासी सांस्कृतीक मेळावा, फिरता किर्तन महोत्सव कार्यक्रम, शिवमहापुराण कथा आयोजन, यासारखे कार्यक्रम केले आहेत.
तर जनतेच्या सेवेप्रती तत्परता व तगडा जनसंपर्क त्यामुळे हिरे कुटुंबाला मतदारसंघातुन तडीपार केले. तसेच भुसे यांची नाळ शेतकरी कुटुंबाशी जोडलेली असल्याने कृषि मंत्री असतांना त्यांनी शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्या काळात घेतले. याशिवाय बांधावरचा कृषि मंत्री म्हणुनही त्यांची ओळख आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्यासह शहराच्या विकासासाठी ते सदैव तत्पर असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. तर मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा व शेतक-यांचा जलसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरणा, मोसम व तालुक्यातील उपनद्यांवर शेकडो बंधारे बांधुन शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके चांगली येऊन त्यांचे उत्पन्न वाढुन जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
तसेच विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणुन मतदारसंघाचा विकास त्यांनी केला आहे. तर लाडकी बहीण योजना व संजय गांधी निराधार योजनेतुन मतदारसंघातील लाखो लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिला. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचा शेकडो रुग्णांना लाभ देऊन ४ कोटी पेक्षा जास्त निधी मिळवुन दिला. त्यामुळे दादा भुसे यांची ‘जनता हेच आपले कुटुंब’ मानणारा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे.
याशिवाय प्रत्येकाच्या दुःख, वेदना आपत्तीत आधार देऊन मनोबल वाढविणारा नेता, जनतेच्या सतत संपर्कात राहणारा नेता, अविश्रांत मेहनत, संस्कारीत व्यक्तीमत्व, चारित्र्य संपन्नता, विकासाची दुरदृष्टी, संघर्ष करण्याची शक्ती, कोरोना काळात निधन झालेल्या रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार, ५०० पेक्षा जास्त जोडप्यांचे सामुदायीक विवाह सोहळ्यात मोफत विवाह संपन्न यासारखी समाज उपयोगी कार्य देखील भुसे यांनी केली आहेत.
मतदारसंघातील प्रभावी विकासकामे
१. छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी, ता. मालेगांव. एकाचवेळी ५ कृषि महाविद्यालय व १ तंत्रनिकेतन कॉलेजला मंजुरी.
२. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय.
३. मालेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी १८४ रु. कोटींचा निधी मंजुर.
४. मालेगांव तालुक्यातील संपुर्ण गावांचा ‘पोकरा’ योजनेत समावेश.
५. नार – पार योजनेत मालेगांव तालुक्याचा समावेश.
६. मॉडयुलर हॉस्पिटल, मालेगांव.
७. खेळाडूंसाठी मालेगांव शहरात व तालुक्यात तालुका क्रीडा संकुलांची निर्मिती.
८. सरकारी रुग्णालयांच्या खाटांची क्षमता वाढविली.
९. शहरात व तालुक्यातील रस्ते क्राँक्रीटीकरण.
१०. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका व संग्रहालय, मोसमपुल, मालेगांव.
११. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा.
१२. गिरणा, मोसम व उपनद्यांवर शेकडो बंधारे.