Thursday, July 23, 2026
Homeनगरजुन्या वादातून तरुणाने वृद्धाच्या छातीत गोळी झाडली; राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील...

जुन्या वादातून तरुणाने वृद्धाच्या छातीत गोळी झाडली; राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील घटना

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

जुन्या वादाच्या कारणातून एका तरुणाने वृद्धाच्या छातीत गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात काल शुक्रवार दि. २९ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३, रा. मोमीन आखाडा, राहुरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा दुचाकीवरून तेथे आला. तू माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत, असे म्हणत त्याने दगडू कोहकडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

दोघांतील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने दगडू कोहकडे यांच्या छातीवर अगदी जवळून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी लागताच दगडू कोहकडे जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी दगडू कोहकडे यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, आर्म अॅक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...