रांजणगाव देशमुख । डॉ. अरुण गव्हाणे
वाढत्या महागाईने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात अगोदरच भरमसाठ वाढ झाली असताना त्यात बनावट खतांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. कोपरगाव तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने आतापर्यंत तब्बल पाच ठिकाणी व तालुक्यातील अनेक कृषी दुकानांवर कारवाई करत तालुक्यातून बनावट खत रॅकेट उद्धवस्त करण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे. मात्र बनावट खतांचे रॅकेट संपूर्ण राज्यभर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे रॅकेट शोधून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्थात याचा ‘आका’ कोण आहे हे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर असणार आहे.
शुक्रवारी तब्बल सात दुकानांवर व चार खत निर्मिती कंपन्यांवर कारवाई करत तब्बल अडीचशे बनावट खत गोण्या जप्त करत ही मोहिम अजून धडक करण्याचा निर्धार कोपरगाव कृषी विभागाने केल्याचे स्पष्ट केले आहे. प्रथम कोपरगाव शहरात खत निर्मिती कंपनीवर कारवाई केली, त्यानंतर लगेच संवत्सर चौफुली येथे बनावट खतांचा ट्रकच जप्त केला. देर्डे को-हाळे येथे बोगस खताचा साठा आढळला तर याच गावात दुसऱ्यांदा कारवाई करताना चक्क बनावट खतांचे पॅकिंग करतानाच्या यंत्रणेवर धाड टाकण्यात आली.
कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे व तालुका गुण नियंत्रक अधिकारी गणेश बिरदवडे यांनी आतापर्यंत पोलिसांच्या मदतीने पाच ठिकाणी ठोस कारवाई केली. मात्र या पाचही ठिकाणी एकतर विक्रीसाठी उपलब्ध असलेले बनावट खत किंवा त्यांची पॅकींग व्यवस्था आढळून आली आहे.
मात्र प्रत्यक्षात निर्मिती करताना कोणीही सापडलेले नाही. त्यामुळे बनावट खत निर्मिती होते कोठून? त्याचा पुरवठा कोण करत आहे? या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरीतच आहे. कोपरगाव कृषी विभागाने त्यांचे काम चोख पार पाडले आहे. मात्र याचा मुख्य आका कोण आहे ? हे शोधण्याचे काम खऱ्या अर्थाने तपास यंत्रणेचे आहे. तालुका कृषी अधिकारी व त्यांची टीमला एवढ्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहचणे व्यावहारिकदृष्ट्या अवघड आहे. मात्र तपास यंत्रणेने यामध्ये लक्ष घातले तर याच्या मुख्य आकापर्यंत पोहचणे तसे अवघड नाही. मात्र कोपरगाव कृषी विभागा एवढी तत्परता त्यांनाही दाखवावी लागेल. तरच शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने अशिर्वाद मिळणार आहे.
बनावट खतांवर कारवाई करत असताना ते खत बनावट आहे किंवा नाही एवढे पाहिले जाते. जर बनावट असेल तर संबधित दुकानदारांवर कारवाई केली जाते. याशिवाय ज्या कंपनीच्या नावाने खत बनविले जात आहे, त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला जातो. मात्र त्या कंपनीच्या नावाचा फक्त वापर केलेला असतो. अशातच मुख्य सुत्रधारापर्यंत पोहचले जात नाही. ज्या लोकांवर कारवाई केली आहे, त्यांना पोलिसी खाक्या दाखवून खऱ्या आकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ती संधी तपास यंत्रणांना असून त्यांनी मुख्य सुत्रधारापर्यंत पोहचण्याचे धाडस दाखविणे गरजेचे आहे.
खत निर्मिती कारखाने त्यांच्या प्रत्येक गोणीवर क्यूआर कोड छापतात. हा क्यूआर कोड गुगल स्कॅनद्वारे पडताळणी करणे अगदी सोपे आहे. क्युआर कोड स्कॅन होऊन कंपनीची सर्व माहिती येते, याशिवाय त्यातील घटक देखील कळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक खताची गोणी स्कॅन करावी व काही संशय आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा, नाव गुप्त ठेवण्यात येईल.
मनोज सोनवणे, तालुका कृषी अधिकारी
अनेक खतांच्या गोण्यांवर झिंक अधिक बोरॉन असे छापलेले असते. मात्र बाजारात असे कोणतेही खत उपलब्धच नाही. प्रत्यक्षात तपासणी केल्यावर यात झिंक किंवा बोरॉनचा अंश देखील नसल्याचा तपासणी अहवालच कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. तसेच असे कोणतेही खत शासनाच्या अधिसुचित यादीत नाही. शेतकऱ्यांची यात मोठी फसवणूक होत असल्याने अशा बनावट कंपन्यापासून सावधान राहिले पाहिजे.
गणेश बिरदवडे, तालुका कृषी गुण नियंत्रण अधिकारी




