मुंबई | Mumbai
राज्यभरात आज (सोमवारी) मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्र भक्तीभावात मग्न झाला आहे. या मंगलमयी पर्वावर राज्यातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन (Ganpati Bappa) झाले असून. त्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, त्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड अशीच अविरत राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झाले असून, त्यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत राज्यातील जनतेला आणि सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
इतर नेत्यांनीही दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “गणेशोत्सवाच्या शुभ दिनी प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि सर्वांचे जीवन आनंदी व्हावे,” अशा शब्दांत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी “विघ्नहर्त्याच्या आगमनाने बळीराजाच्या शिवारात भरघोस पीक येवो, कष्टकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळो आणि युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळो,” अशी प्रार्थना करत त्यांनी शिस्त व पर्यावरणाचे भान ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चैतन्याने सळसळणाऱ्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन आनंदाची उधळण करावी,” असे सांगत जनतेला शुभेच्छा दिल्या.




