नाशिक | Nashik
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, नाशिक शहर गणेशोत्सवासाठी (Nashik City Ganeshotsav) सज्ज झाले आहे. सोमवारी (दि.१४) गणेशोत्सवाला सुरुवात होत असून यंदा तब्बल नऊ वर्षांनंतर गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा असणार आहे. घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेसह सार्वजनिक मंडळांच्या तयारीलाही अंतिम स्वरूप आले आहे.
पंचांगातील तिथीच्या गणितामुळे यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा, पूजा साहित्याची दुकाने, फुलबाजार आणि गणेशम र्ती विक्री केंद्रांवर गर्दी (Crowd) होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याने घराघरांत त्याची तयारी सुरू आहे. १७ सप्टेंबरला गौरी आवाहन, १८ सप्टेंबरला गौरी पूजन, तर १९ सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे. यंदाच्या १२ दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
रविवार कारंजा, मेन रोड आणि परिसरातील रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची (Vehicles) वर्दळ वाढल्याने काही वेळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. रविवार कारंजा परिसरात फुले, फळे, पत्री तसेच विविध प्रकारचे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे परिसराला सकाळपासूनच उत्सवाचे स्वरूप आले होते. गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याने घरगुती गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल झाले. झेंडू, गुलाब, शेवंती यांसह विविध फुलांना मागणी होती. पूजेसाठी आवश्यक पत्री, दुर्वा, नारळ, सुपारी, अगरबत्ती, कापूर, हळद-कुंकू, हार तसेच फळांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
दुपारी १.५१ पर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
सकाळी ७.०६ वाजता चतुर्थी तिथी सुरू होणार आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजेसाठी दुपारी १.५१ वाजेपर्यंत मुहूर्त असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे. त्यात सकाळी १०.३० ते दुपारी १२.५८ हा कालावधी पूजा व प्रतिष्ठापनेसाठी विशेष अनुकूल मानला जात आहे. गणेशोत्सवात गणपती आणण्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची सक्ती धर्मशास्त्रात नसून राहुकाळ किंवा विष्टिकरणाची अनाठायी भीती बाळगू नये, असे ज्योतिष-धर्मशास्त्र तज्ज्ञ डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले. यंदा गणेशस्थापनेसाठी मुख्य मुहूर्त सकाळी ११.४० ते दुपारी १.४४ असा आहे.




