Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याएक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी विकासाची पंचसूत्री - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी विकासाची पंचसूत्री – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई / प्रतिनिधी
कोविड काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरविली असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे काढले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी राज्याला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत असल्याचे सांगत केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल- २०२१’ मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ४३ अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत असून मुंबई येथे मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात महाआवास योजनेतून पावणेपाच लाख घरे देण्यात आली तसेच जल जीवन मिशनमध्ये १७४ पाणीपुरवठा योजना सुरू होत आहेत. १०० कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात होतकरू युवक-युवतींच्या मंजूर प्रकल्पांतून सुमारे ११०० कोटी रूपये गुंतवणूक होत आहे. कोरोना संकटकाळात गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली. सध्या राज्यात १ हजार ५४९ शिवभोजन केंद्रे सुरू असून ९ कोटी १८ लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यपालांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या