पुणे | Pune
अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) रविवारी (२ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari ) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने (Prithviraj Mohol) बाजी मारत चांदीची गदा पटकावली. मात्र यंदाची स्पर्धा वादग्रस्त ठरली आहे. डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) असलेल्या शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत रागाच्या भरात पंचांना लाथ मारली.
त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र, शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला, शेवटी त्याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडले. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्याने महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर तीन वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय कुस्तीगीर परिषदेने (Wrestlers Council) घेतला आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर शिवराज राक्षे यांच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया देत पंचांवर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी बोलतांना शिवराजची आई (Mother) म्हणाली की,” पंचांना समजायला हवं होतं, असा निर्णय घ्यायला नको होता. त्यांनी नंतर चुक मान्य केली, त्यावेळी रिव्ह्यू दाखवला असता तर ही वेळ आली नसती. माझा मुलगा असा करणार नाही गॅरंटी आहे. त्याने १०-० ने सर्व कुस्त्या काढल्या आणि त्यांनी खोटा निर्णय दिला, त्यांनी रिव्ह्यू दाखवला नाही त्यामुळे कोणीपण चिडणार. मॅटवर जाताना शिवराजला शिवीगाळ केली, असे नव्हतं करायला पाहिजे. निलंबित करणे म्हणजे गरिबाच्या मुलावर अन्याय केला. आमचे मत आहे की पंचांनाही शिक्षा द्या. आमचेही गरीब घरातील कुटुंब आहे. दुध व्यवसायातून आम्ही त्याला घडवले आहे. तुम्ही असा ठोक निर्णय का घेता? फक्त मुलांनाच नाहीतर पंचांनाही शिक्षा द्या”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पंचांना मारहाण केल्यानंतर शिवराज राक्षे काय म्हणाला?
स्पर्धकाचे दोन्ही खांदे टेकले तर कुस्ती जिंकली असा निर्णय दिला जातो. तुम्ही आम्हाला रिप्ले दाखवा. रिप्लेमध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. पंचांनी माझ्यावर अन्याय केला आहे. अन्याय माझ्यावर झालाय ना तर देव त्याच्याकडे बघून घेईल. १०० टक्के ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना भेटणार आहे. पुणे जिल्ह्याचा व्यक्ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर माझ्यावर अन्याय झाला. ‘त्यांनी निर्णयच खोटा दिला. आक्षेप घेतल्यानंतर पंचांचे काम आहे की, रिप्ले बघून निर्णय घ्यायचा पण रिप्ले तुम्ही बघितला नाही आणि थेट विजयी घोषित करून टाकले. हे १०० टक्के जाणूनबुजून केले आहे, असा थेट आरोपच शिवराज राक्षे याने यावेळी केला आहे.