अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67 व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब 2024-25 लढत अहिल्यानगर शहरात होत आहे. येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान वाडियापार्क मैदानात या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. अहिल्यानगरला या स्पर्धेचे यजमान पद मिळाल्याचा आनंद माझ्यासह सर्व कुस्तीगीरांना झाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम विजेत्यास रोख परितोषिक, मानाची चांदीची गदा या बरोबरच माझ्यावतीने चारचाकी वाहनही देण्यात येणार आहे, अशी माहिती अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेच्या आयोजनाची व तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.आ. जगताप म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील युवकांना लाल मातीशी जोडण्यासाठी या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या क्षेत्राला अधिक बळकटी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. यावेळी पै. भोंडवे म्हणाले, विजेत्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावतीने मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते रात्री 8:30 पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत 42 संघ सहभागी होत आहेत. यात सुमारे 840 कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान सुमारे 900 कुस्त्या होतील. ह्या स्पर्धेसाठी 100 पंच व 80 पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडल्या जातील.