Friday, January 23, 2026
HomeनगरElection News : आधी पालिका, नंतर झेडपी निवडणूक; अतिवृष्टीमुळे निर्णय?

Election News : आधी पालिका, नंतर झेडपी निवडणूक; अतिवृष्टीमुळे निर्णय?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

एकापाठोपाठ निवडणूक तयारीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यापैकी कोणाचा गुलाल आधी उधळला जाणार याबाबत उत्सुकता असतानाच आधी नगरपालिका, नगरपरिषदेच्या तर त्यानंतर डिसेंबरअखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात ११ नगर परिषद व १ नगर पंचायतीसाठी तर जिल्हा परिषदेच्या ७५ आणि पंचायत समितीच्या १५० गणांसाठी एकापाठोपाठ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. याचा फटका हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची भीती सत्ताधारी महायुतीला आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबरअखेर घेतल्यास त्याचा तितकासा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे या निवडणुका दुसऱ्या टप्यात म्हणजे डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणुक आयोगाने आढावा घेतला. यात पहिल्या टप्यात राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील २४७ नगर पालिका आणि १४७ नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे संकेत दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वात आधी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात शेतीची हानी झाली आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलीच झाल्यास त्याचा विपरीत परिणाम त्यावर, होऊ शकतो.

भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आदींना शेतकरी वर्गाची नाराजी परवडणारी नाही. शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती ही मदत मिळण्यास काहीसा विलंब लागत आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबरअखेर घेतल्यास त्याचा तेवढा परिणाम जाणवणार नाही, असे महायुतीचे गणित आहे. जानेवारी अखेर निवडणुका पार पाडाव्या लागणार प्रारंभी निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती. परंतु याचा फटका नको, यासाठी या निवडणुका या डिसेंबरअखेरीस घेतल्या जातील. पहिल्या टप्यात, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील. अन् अखेरच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे सांगितले जात आहे. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत.

२८ ऑक्टोबरला मतदार यादी कार्यक्रम

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी २८ ऑक्टोबरपर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. यात प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर ८ ते १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सुचना, त्यावर सुनावणी घेवून मंगळवार (दि. २८ ऑक्टोबरला) अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच ७नोव्हेंबरला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झाल्या मतदारांची नाव या मतदार यादी राहणार आहे.

ताज्या बातम्या

राज

Raj Thackeray: “आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज…”; राज ठाकरेंकडून...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज १००वी जयंती आहे. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होत आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेसह राज्यभरात...