
मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सत्ताधारी महायुती आणि विशेषतः शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेत असली तरी, त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या अंतर्गत गोटात मात्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेने त्यांचा ‘प्रहार’ पक्ष विलीन करण्याची अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही काळापासून महायुतीपासून काहीसे दूर गेलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. २०१४ च्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कडू २०२४ च्या निवडणुकीत मात्र स्वतंत्र लढले होते. मात्र, आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेनेने त्यांच्यासमोर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेली आपली संघटना बच्चू कडू विसर्जित करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोघांच्याही नावावर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. “राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेवरही नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी द्यावी,” अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः “बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध काय?” असा सवाल करत शिवसैनिकांनी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलू नये, अशी भूमिका घेतली आहे.
यावेळी १० जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेली जागा आणि इतर ९ जागा अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. राजकीय गणितांनुसार, १० पैकी ९ जागा महायुती सहज खिशात टाकू शकते, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. ९ जागांसाठी प्रत्येकी २९ मतांचा कोटा असून, पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी ५१ टक्क्यांची मर्यादा असेल.
निवडणूक कार्यक्रम
- अधिसूचना: २३ एप्रिल २०२६
- अर्ज भरण्याची मुदत: ३० एप्रिल २०२६
- छाननी: २ मे २०२६
- मतदान आणि निकाल: १२ मे २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान, सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)




