
मुंबई । Mumbai
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची (२१.१४ टक्के) नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. मात्र, त्यापैकी सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली असून त्यांचा समावेश प्रारूप यादीत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वगळल्या गेलेल्या मतदारांची संख्या १ कोटी ९० लाख इतकी असल्याचा असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.
याशिवाय सुमारे ३४ लाख मतदारांचे मृत्यू झाल्याने त्यांची नावे एसआयआरमधून वगळली गेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात १ कोटी ५६ लाख मतदार यादीतून बाहेर गेले आहेत. यातील जे पात्र मतदार आहेत, त्यांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.मतदारांना ही यादी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलसह, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
गणना प्रपत्र प्राप्त न होणे, संबंधित पत्त्यावर मतदार गैरहजर किंवा न सापडणे, स्थलांतर, मृत्यू, अन्यत्र नोंदणी अथवा दुबार नोंदणी आणि गणना प्रपत्र भरण्यास नकार यामुळे मतदार यादीतून वगळले गेले. अशा मतदारांची कारणांसह यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसआयआरपूर्वी राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी प्रारूप मतदार यादीत ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा (७८.८६ टक्के) समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३, हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती
प्रारूप मतदार यादीवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना, तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना प्रपत्र-६ द्वारे नाव नोंदणी करता येईल. यादीतील नावाबाबत आक्षेप असल्यास प्रपत्र-७, तर नाव, पत्ता, वय किंवा लिंग यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रपत्र-८ भरता येणार आहे.
प्रारूप यादीतील २००२-२००४ च्या मतदार यादीशी जुळवणी न झालेले मतदार तसेच तार्किक विसंगती आढळलेले मतदार यांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे. दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदान केंद्राची संख्या घटली
विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वीची १ लाख २५३ मतदान केंद्रांची संख्या कमी होऊन आता ती १ लाख २१६ इतकी झाली आहे. यात ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली असली तरीही मतदारसंख्या घटल्याने ४३१ केंद्रे कमी करण्यात आली. याशिवाय १ हजार ४०३ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मतदान केंद्रांचा समावेश आहे. येथील तात्पुरत्या स्वरूपातील मतदान केंद्रांना आता कायमस्वरूपी इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
पुण्यात सर्वाधिक मतदार बाहेर
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार प्रारूप यादीत समावेश न झालेल्या मतदारांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. पुण्यात २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात २८ लाख ५९ हजार ३७७, मुंबई उपनगरात २६ लाख ५८ हजार २०२ आणि नागपूरमध्ये १४ लाख ४३ हजार २६७ मतदारांचा समावेश आहे. नाशिकमध्ये १० लाख २७ हजार ७९२, मुंबई शहरात ९ लाख ५० हजार ७२०, पालघरमध्ये ६ लाख ६८ हजार ७०९, तर सोलापूरमध्ये ६ लाख २२ हजार ६७१ मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत.
पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यांतील अशा मतदारांची संख्या मिळून ८३ लाख ८४ हजारांहून अधिक आहे. तर मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून ७७ लाख २१ हजारांहून अधिक मतदारांचा वगळल्या गेलेल्यांमध्ये समावेश आहे.
मतदार का वगळले गेले?
मतदार यादीतील निवासाच्या ठिकाणी गैरहजर असणे, न सापडणे
त्या ठिकाणाहून स्थलांतरित झालेले असणे, मृत असणे, गणना प्रपत्र प्राप्त न होणे
अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार नोंदणी आणि गणना प्रपत्र भरण्यास दिलेला नकार




