मुंबई | Mumbai
कॉम्रेड गोविंद पानसरे (Cromrade Govind Pansare) हत्या प्रकरणी अटकेत (Murder Case) असलेले संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी ९ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. यानंतर आज (मंगळवार) तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते. यानंतर आज (मंगळवार) तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) कोल्हापुरातील सर्किट बेंच याठिकाणी सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एकूण सर्व १२ संशयीतांची मुक्तता झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात मॉर्निंग वॉकला गेले असताना २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन व्यक्तींनी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचार घेत असताना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचा २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यांचं वय ८२ वर्षं होते. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी उमा पानसरे देखील गंभीर जखमी झाल्या होत्या. ज्यावेळी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात काहींना अटक झाली त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अखेर या प्रकरणातील सर्व संशयितांना आज जामीन मंजूर झाला आहे.




