मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यात दीड वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला (Anti-Narcotics Task Force) आता अधिकारी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ३४६ पदांना आणि त्यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. या फोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या ३४६ पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास आज मंजूरी देण्यात आली. यापैकी ३१० पदे नियमित असतील तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
नियमित पदांमध्ये (Positions) विशेष पोलीस महानिरीक्षक-१, पोलीस उपमहानिरीक्षक १, पोलीस अधीक्षक-३, अतिरिक्त पोलीस अधीक्षक-३, पोलीस अधीक्षक-१०, पोलीस निरीक्षक १५, सहाय्यक पोलीस निरीक्षक – १५, पोलीस उपनिरीक्षक – २०, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – ३५, पोलीस हवालदार – ४८, पोलीस शिपाई – ८३, चालक पोलीस हवालदार -१८, चालक पोलीस शिपाई -३२, कार्यालय अधीक्षक – १, प्रमुख लिपीक – २, वरिष्ठ श्रेणी लिपीक -११, कनिष्ठ श्रेणी लिपीक – ७, उच्च श्रेणी लघुलेखक – २, निम्न श्रेणी लघुलेखक – ३ यांचा समावेश आहे.
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे- वैज्ञानिक सहाय्यक-३, विधी अधिकारी – ३, कार्यालयीन शिपाई -१८, सफाईगार – १२ एकूण अशी ३६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी येणाऱ्या १९ कोटी २४ लाख रुपये आवर्ती खर्चास रुपये तर वाहन खरेदीसह ३ कोटी १२ लाख रुपयांच्या अनावर्ती अनावर्ती खर्चास मंत्रिमंडळाने (Cabinet) मान्यता दिली.