मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील मतदार यादीत (Voter List) मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी (Mahavikas Aaghadi and MNS Leaders) केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अखेर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारींनंतर मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी या सर्व त्रुटींची कसून चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) तोंडावर असताना विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मतदार यादीतील गंभीर अनियमितता आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. आता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकान्यांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दिवाळी (Diwali) असल्यामुळे कदाचित पुढील आठवड्यात हा संपूर्ण अहवाल येण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याची प्रत दिली जाईल. अनेक मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी समाविष्ट आहेत. एकाच पत्त्यावर ५०. १०० किंवा त्याहून अधिक मतदारांची नोंदणी आढळून आली आहे तसेच अनेक मतदारांच्या पत्त्यांच्या जागी केवळ डेंश (-) किंवा शून्य (०) अशी नोंद आहे. चुकीचे क्रमांक किंवा एकाच फोटो आयडीवर अनेक नावांची नोंदणी असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, आयोगाची वेबसाईट (Website) हाताळणी आणि मतदार यादीतील बदलांच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यानंतर आयोगाच्या चौकशी करण्याच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. आता मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी आयोग नेमके कोणते तातडीचे आणि ठोस उपाययोजना करते आणि आगामी निवडणुका या शुद्ध केलेल्या यादीवर होतात की नाही, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
…तर आयोगाला का जमत नाही?
मतदार याद्यांमधील त्रुटींबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सांगितले की, राज्यामध्ये किमान एक कोटीपेक्षा अधिक नावे मतदार यादीतून बाजूला होतील. त्यामुळे मतदार बूथवरील लोड कमी होईल आणि यंत्रणासुद्धा कमी लागेल. जर राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावे शोधून काढत असेल, तर निवडणूक आयोगाला अधिकृत काढायला काय अडचण आहे? अशी विचारणा त्यांनी केली. एखादा निवडणुकीत पडलेला किंवा निवडून आलेला उमेदवारही तुम्ही दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो, तर मग आम्ही काढत असेल तर तुम्हाला का जमत नाही? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने जर ठरवले तर ४८ तासांत दुबार नावे मतदार यादीतून कमी होऊ शकतात.
मतदार यादी प्रमुखांचा आज मेळावा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील घोळ समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (दि.१९) सकाळी १० वाजता गोरेगाव (पू) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी आणि निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर यावर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अधिसूचीत केलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा विरोधी पक्ष महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आरोप मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने फेटाळले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत असलेल्या याद्या भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेली मतदारांची दुबार नावे आणि क्यांमधील फरक यामध्ये यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली असून संबंधित मतदारांचे नाव फक्त एकाच ठिकाणी असल्याचा ठाम दावा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केला आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया लोकप्रतिनिधी अधिनियम, मतदार नोंदणी नियमातील तरतुदी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कायदेशीर प्रक्रिया करून करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.




