अहिल्यानगर | Ahilyanagar
इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचे परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर (Gas Shortage) झाला आहे. गॅसची टंचाई दिवसेंदिवस जाणवत असल्याने अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे गॅस संपण्याच्या भीतीपोटी अनेक नागरिक भर उन्हात गॅसच्या कार्यालयाबाहेर सिलेंडर घेऊन रंगांमध्ये उभे आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र (CM Devendra Fadnavis) फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना आश्वस्त केले आहे. ते अहिल्यानगरच्या राहुरी येथील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की,”नागरिकांनी केंद्र सरकारच्या (Central Government) निर्देशाप्रमाणे वागायला हवे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीव पूर्वक भीती पसरविण्याचे काम करत आहेत. गोंधळाची परिस्थिती झाली तर चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करू शकतात. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करत असून, त्यावर विश्वास ठेवा”, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबतही भाष्य
केंद्रीय निवडणूक आयोग आज (रविवारी) देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले.
उमेदवार कोण?
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. कायद्यानुसार एखाद्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे आता या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत.
फडणवीसांना डॉक्टर पदवी बहाल
आज (रविवार) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानामुळे मुख्यमंत्री आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत.





