मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून कृषी खात्यातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शेतकऱ्यांना (Farmer) अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला. कृषी खात्याने मेटलडिहाइड नावाचे कीटकनाशक २५ कोटी १२ लाख रुपयांना खरेदी केले. या खरेदीत २० कोटी ६७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. या भ्रष्टाचाराशी (Corruption) संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून कृषी खात्याकडून (Department of Agriculture) साहित्य खरेदीत झालेल्या गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. आज त्यांनी कीटकनाशक खरेदी घोटाळ्याबाबत माहिती दिली. कृषी उद्योग महामंडळाने कीटकनाशक पुरवठ्यासाठी १६ मार्च २०२४ रोजी २५ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले. यासंदर्भतील खरेदी प्रक्रिया ही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आणि निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. ऑनलाईन पोर्टलवर पीआय इंडस्ट्रीजचे मेटलडिहाइड हे कीटकनाशक २२५ रुपये किलो प्रमाणे उपलब्ध असताना निविदेत आलेल्या १ हजार २७५ रुपये किलोच्या दराने त्याचा पुरवठा सरकारला करण्यात आला. सरकारने १ हजार ५० रुपये प्रति किलो जादा दराने १ लाख ९६ हजार ९४१ किलो कीटकनाशक खरेदी करून २० कोटी ६७ लाख ८८ हजार ५० रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.
या निविदा प्रक्रियेत (Tender Process) चार निविदाधारकांनी भाग घेतला असता तिघांना पात्र ठरवण्यात आले आणि एकाला अपात्र ठरवले. पात्र ठरवण्यात आलेल्या तीन निविदाधारकांपैकी दोघांची वार्षिक उलाढाल निविदेत अनिवार्य असलेले १० कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तसेच त्यांच्याकडे अनिवार्य असलेले पुणे आयुक्त कार्यालयाचे कीटकनाशक विक्री परवाना नव्हता. वरील त्रुटी असताना सुद्धा त्या दोन निवीदाधारकाला महामंडळातील अधिकाऱ्यांनी निविदाधारकाशी संगनमत करून त्या अपात्र होणाऱ्या निवीदाधारकांना पात्र करण्यात आले. दोघांना अपात्र केले असता तर एकच निविदाधारक पात्र ठरला असता आणि फेरनिविदा करावी लागली असती,असे पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, या निविदेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संपूर्ण व्यवहाराशी संबंधित तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी वैभव पवार, कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोंदावले, कीटकनाशके, लेखा आणि वित्त विभागाचे महाव्यवस्थापक सुजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयएल विजय पाथरकर, उपमुख्यव्यवस्थापक कीटकनाशके देवानंद दुथडे यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.