Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयMaharashtra News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची चर्चेची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची चर्चेची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभेत विरोधक आक्रमक

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नावरून विरोधी पक्षाने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. तीन महिन्यात राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बैल नाही म्हणून शेतकऱ्याला स्वत:ला जुंपून घ्यायची वेळ आली आहे. कर्जमाफी (Loan Waiver) देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले सरकार आता आश्वासन विसरले असल्याची चौफेर टीका करत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतचा प्रस्ताव आणावा मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार असल्याचे विरोधी पक्षाला सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, असे पवार यांनी बजावले. मात्र, तत्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

- Advertisement -

आज विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातला. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि त्यांच्या वारसांना सरकार मदत देत नाही. कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अपमान करतात. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनीही शेतकरी आत्महत्यांवर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

YouTube video player

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ही मागणी मान्य केली. शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. विरोधी पक्षाने मला याबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा. मी या प्रश्नावर संपूर्ण दिवस चर्चा करायला देण्यास तयार असल्याचे नार्वेकर म्हणाले. अजित पवार यांनीही यावेळी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

तसेच विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर (Farmer Issue) चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही. विरोधी पक्षाला त्यांच्या गुरूवारच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे, असेही पवार म्हणाले.

बबनराव लोणीकर यांचा खुलासा

दरम्यान, शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी टीकेचे धनी ठरलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी विधानसभेत खुलासा केला. मी शेतकरी विरोधी बोललो असा आरोप करण्यात आला. मी गेली ४० वर्ष राजकारणात आहे. २५ वर्ष शेतकरी मला निवडून देत आहेत. मी शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केले आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. परंतु, काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतरही माझी हाडे सुद्धा म्हणतील मी शेतकरी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसोबत आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले. मी शेतकरी विरोधी बोललो असेन तर हजार वेळा माफी मागायला तयार आहे. पण माझ्या वक्तव्याची मोडतोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...