Monday, September 7, 2026
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis on Missing Link : पहिल्याच पावसात 'विकास' मिसिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या...

Devendra Fadnavis on Missing Link : पहिल्याच पावसात ‘विकास’ मिसिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या ‘मिसिंग लिंक’चा स्लॅब कोसळताच विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; कोण काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

पुणे जिल्ह्यात (Pune District) रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. या मार्गावरील एका बोगद्याचा (टनेल) स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट रस्त्यावर आला. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्ड्यांचे फोटो व्हायरल झाले होते, आणि आता थेट स्लॅबलाच भगदाड पडल्याने या प्रकल्पाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

‘इन्फ्रामॅन’चा ‘डिझास्टर मॅन’ झाला – सपकाळ

या दुर्घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “पहिल्याच पावसात ‘Infra Man’ चा ‘Disaster Man’ झाला आहे! दोन खड्ड्यांना ‘पहिल्या पावसाचं टेस्टिंग’ म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही ‘मान्सून ट्रायल’ म्हणणार का? जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प… पण पहिल्याच पावसात विकासच ‘मिसिंग’ झाला आहे”, असे त्यांनी म्हटले.

मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका करताना म्हटले की,”मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार”, असे त्यांनी म्हटले.

छप्पन टक्क्यांची कमाल – अंबादास दानवे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर टीका करताना म्हणाले की, ही सगळी छप्पन टक्क्यांची कमाल असून,मिसिंग लिंकचा स्लॅब मिसिंग झाला आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे तर ‘फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स’ – सतेज पाटील

काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनीही या परिस्थितीवरून सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. “या मिसिंग लिंकवरून सुरू असलेलं क्रेडिट वॉर आपण सर्वांनी बघितलं आहे, मग आताच्या या दुरावस्थेचे क्रेडिट देखील त्यांनीच घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता, मग सरकारने आधीच नियोजन का केले नाही? एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी आणि अपघात होताना दिसत आहेत. हे पूर्णपणे ‘फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स’ (प्रशासनाचे अपयश) आहे. मंत्री म्हणतात अजून परिस्थिती खराब होणार आहे, मग आधीच लोकांना सतर्क का केले नाही? हे संवेदनहीन सरकार आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...