Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; म्हणाले, "ही आरपारची..."

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; म्हणाले, “ही आरपारची…”

जालना | Jalna

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे कूच केली आहे. आज (बुधवारी) सकाळी १० वाजता मनोज जरांगे हे अंतरवालीतून मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.

- Advertisement -

काल (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांना पाठवून मनोज जरांगेंनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नये, अशी मनधरणी केली. मात्र, जरांगे हे २७ ऑगस्टला मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यानंतर आज सकाळीच मनोज जरांगेंनी मुंबईकडे मोर्चा काढला आहे.

यावेळी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “हिंदू देव-देवतांना पुढे करुन मराठा समाजाला विनाकारण त्रास दिला जात आहे. आम्ही हिंदू असूनही आमच्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखले जात आहे. आज ज्यांना हिंदुत्त्वाशी देणंघेणं नाही, धर्माशी देणंघेणं नाही, ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्व लागतं, ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत. हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, याचे उत्तर अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी द्यावे. यासाठीच तुम्ही राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, “मराठा आंदोलक शांततेत मुंबईला येत असताना हिंदू असूनही त्यांना त्रास दिला जात आहे. राज्य सरकारलाच सणाच्या दिवशी अशांतता पसरवली जात आहे. आम्ही काय धिंगाणा घालायला किंवा जमिनी घ्यायला मुंबईत येत आहोत का? मग आम्हाला अडवण्याचा अट्टाहास का? राज्य सरकार हिंदूविरोधी वागत आहे. आम्हालाही कळतं की, हिंदू सणात अडथळे नको. गणेशोत्सवाला गालबोट लागेल, असं पाऊल आम्ही मेलो तरी उचलणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना त्यांची चूक झाकायची आहे, म्हणून मराठ्यांची अडवणूक केली जात आहे. देवी-देवतांच्या आडून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करणे आम्ही खपवून घेणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

तसेच “आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचे. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो. कितीही दिवस लागू दे, पण संयम सोडू नका. अशी लढाई कधी जगाच्या पाठीवर झाली नसेल इतक्या डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. तर २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.

जरांगेंना पोलिसांनी घातलेल्या अटीशर्ती

  • प्रवासासाठी कोणत्या ठिकाणाहून किती लोक येणार आहेत याबाबत जिल्हा / तालुका/ गाव निहाय माहिती पोलीस विभागास कळविण्यात यावी, त्याबाबत आपल्याकडेही माहीती ठेवावी.
  • सदर प्रवासामध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने जसे अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड इत्यादी तसेच इतर वाहने आणि वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • आपण ज्याठिकाणी थांबणार आहात त्याठिकाणी अस्वच्छता व रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • तसेच रस्त्यामध्ये कोणीही कचरा टाकणार नाही आणि घाण पसरवणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ज्याठिकाणी थांबणार आहात त्याठिकाणी पुरेशी प्रसाधनगृह व शौचालय याची व्यवस्था करावी.
  • सदर प्रवासामध्ये तांत्रिक दृष्ट्या योग्य व सुरक्षित असलेली वाहनेच प्रवासासाठी येणाऱ्या लोकांनी आणावीत, जेणे करुन कोणतीही अप्रिय घटना/अपघात होणार नाही.
  • सदर प्रवासामध्ये विनापासिंग, फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न सायलेन्सर असलेले मोटार सायकल व इतर वाहने सामिल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासामध्ये एक मोटार सायकलवर 02 पेक्षा जास्त नागरिक असणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच प्रमाणे इतर वाहनांवर सुध्दा क्षमतेपेक्षा व नियमानुसार प्रवासी बसतील याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासादरम्यान कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासामध्ये मोठ-मोठ्याने हॉर्न, सायलेन्सर वाजविण्यात येऊ नये.
  • सदर प्रवासामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना रस्त्याचे एका कडेने चालण्याच्या सूचना द्याव्यात जेणे करुन वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही. तसेच स्वतःची व इतरांच्या सुरक्षीततेची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात याव्यात.
  • मुंबईकडे वाहनांनी आंदोलक निघाल्यास वाहनांची व लोकांची गर्दी होऊन त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सदर प्रवासा दरम्यान खाजगी / सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आंदोलन कर्त्याची राहील. अशा एकूण ४० अटी शर्ती परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच…!; काँग्रेसचा आ. सत्यजित तांबेंना टोला

0
मुंबई | Mumbai महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पुन्हा तापले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसवर टीका केली होती....