मुंबई | Mumbai
नागपूर जिल्ह्यातील (Nagur District) काटोल तालुक्यातील (Katol Taluka) राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जीमध्ये या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवारी) सकाळी सातच्या सुमारास एक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १२ कामगारांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. तर काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळ एसबीएल एनर्जीचा प्रकल्प असून, येथे डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स आणि सिस्मिक एक्सप्लोजिव्ह्सचे उत्पादन केले जाते. याच प्रकल्पातील एका युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात मोठा आवाज घुमला आणि कारखान्याच्या काही भागांना आग लागली. घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये ३० हून अधिक कामगार कार्यरत होते. या स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक विभगाकडून (Police and Fire Department) तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. तर परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तसेच या स्फोटानंतर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून, १५ हून अधिक जखमी झाल्याचे म्हटले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षिततेबद्दल दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.




