मुंबई | Mumbai
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik Court) मंगळवार (दि.२४) रोजी पुन्हा एकदा पाच दिवसांची म्हणजे (दि.२९ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असून, त्याच्या गुन्हेगारी विश्वातील एक अत्यंत धक्कादायक आणि जुने प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिकच्या बाळू तुपे या पत्रकाराची खरातने हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे या हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार आव्हाड म्हणाले की, “अशोक खरातला वाचवण्यासाठी २००७ मध्ये पत्रकार बाळू तुपे यांचा पहिला बळी देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नाही अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले”, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच तुपे यांच्या कुटुंबियांनी आव्हाड यांची भेट घेऊन या जुन्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. जर बाळू तुपे (Balu Tupe) यांच्या हत्येचा संबंध अशोक खरातशी असेल तर निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुन्हा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कोण होते बाळू तुपे
दिवंगत बाळू तुपे हे नाशिकचे पत्रकार होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांत काम केले होते. तुपे यांनी पत्रकारिता करताना विविध विषयांना हात घातला होता. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून खरातच्या भोंदूगिरीवर आणि अवैध कामांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर खरातच्या समर्थकांनी तुपेंशी संपर्क साधला होता. त्यावेळी अशोक खरातने उलटा डाव टाकत बाळू तुपे यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कालांतराने तुपे यांची निर्घृण हत्या झाली. त्यांची हत्या होण्यामागे काहीजण होर्डिंग्जचा वाद तर काहीजण जमिनीच्या जागेचा वाद असल्याचे सांगत होते. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये चर्चा देखील झाली होती. मात्र हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे गांभीर्याने घेतले गेले नाही. याप्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल होता, मात्र यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर




