मुंबई | Mumbai
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूच्या मित्रपक्षांनी काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर आगामी काळात महापालिकांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहे, त्यासाठी ही राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यात यंदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीचे संकेत देण्यात आले आहे. मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आगामी निवडणूक एकत्र लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सततच्या भेटीमुळे मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा अंदाज लावला जात आहे. पण अद्यापही दोन्ही नेत्यांकडून याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. अशातच राज ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीने मोठे विधान केले आहे. ‘मनसे मविआमध्ये जाणार नाही’, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. आमच्या पक्षाचा निर्णय सन्माननीय राज ठाकरे घेतात,’ असे सांगत संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत न घेण्याच्या निर्णयावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, ‘मारहाणीची भाषा करणारे आमच्या सोबत नको. समविचारीची भाषा करणाऱ्यांना सोबत घेऊन जाणार.’ वर्षा गायकवाड यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबतच राहणार की मनसेसोबत युती करणार याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.




