Tuesday, July 14, 2026
HomeनगरAhilyanagar : स्मार्ट मीटरला खासदारांचा विरोध

Ahilyanagar : स्मार्ट मीटरला खासदारांचा विरोध

खा. वाकचौरे, खा. लंके || वाढीव वीज बिलाद्वारे ग्राहकांचा खिसा कापण्याचा प्रकार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्मार्ट मीटर बसवल्याने नागरिकांना वीजबिल वाढवून येत आहे. लोकांचा विरोध, तक्रारी असताना स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह धरु नका. यापूर्वीच्या मीटरपेक्षा आता नागरिकांनी दीड-दोन पट वाढीव बील आहेत. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या नागरिकांचा खिसा कापणे आहे. त्यामुळे इथून पुढे स्मार्ट मीटर बसवू नका, अशी मागणी खा. भाऊसाहेब वाकचौरे, नीलेश लंके यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केली. दरम्यान, महावितरण कंपनीच्यावतीने दिलेला खुलासा हा संयुक्तीक नसल्याचे सत्ताधारी भाजपचे आ. विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी खा नीलेश लंके, आ. विवेक कोल्हे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आदी उपस्थित होते. यावेळी खा. लंके म्हणाले, स्मार्ट मीटरच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. मुख्यमंत्र्यांनी असे मीटर लावू नका, म्हणून सांगितले असताना महावितरणचे अधिकारी कशाला आग्रह धरतात? यावर महावितरणचे अधिक्षक अभियंता रमेश पोवर म्हणाले, जुने मीटरचे बील आणि नवीन मीटरच्या बील एकत्रित आल्याने पहिले बील वाढवून आले आहेत. यासाठी तक्रारदारांची कार्यालयात शिबीर घेऊन दोन्ही मीटरचे प्रात्यक्षिक दाखवून देवू. ग्रामीण भागात डीपीची गंभीर समस्या आहे.

डीपी जळल्यानंतर शेतकर्‍यांना तीन-चार महिने नवीन डीपी मिळत नाही. काही डीपीवर अतिरिक्त कनेक्शनचा लोड वाढला आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांचे वीजबील लाखांत थकले आहेत. त्यामुळे पाणी असून देखील नागरिकांना पाणी मिळत नाही. यापूर्वी शासन 50 टक्के वीजबील भरत होते. पाणी योजनेच्या वीजबीलात 100 टक्के सवलत द्या, अशी मागणी करत वाकचौरे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना लक्ष घालण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकर्‍यांना वेळत डीपी उपलब्ध होण्यासाठी डीपीडीसीमधून अधिक निधीची तरतूद करण्यात येईल. महावितरणचे अधिकारी म्हणाले, पाणी योजनेत सवलत मिळावी म्हणून प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवण्यत येणार आहे.

सौरपंप दुरुस्तीची समस्या
शेतकर्‍यांना देण्यात आलेले सौर पंप दुरुस्ती वेळेवर होत नाही. तीन-चार महिने सौरपंपाची दुरुस्ती होत नसल्याचा मुद्दा दिशा समितीचे सदस्य सुनिल रासने यांनी उपस्थित केला. यावर लंके म्हणाले, सौर पॅनल दुरुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीची माहिती शेतकर्‍यांना द्या.

कोपरगावातील 277 कोटींच्या योजना रखडल्या
आ. विवेक कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील पाणी योजना रखडल्याने नागरिकाच्या तक्रारी येत असल्याकडे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले, 277 कोटी रुपये मंजूर होऊन एकही योजना कार्यान्वीत नाही. नवीन योजना सुरु करण्यासाठी जुने प्रकल्प तोडण्यात आले. परंतु नवीन आणि जुन्या दोन्ही योजना बंद आहेत. परवडत नसल्याचे कारण देऊन अधिकारी पळून गेल्याचे सांगितले. यावर जीवन प्राधिकरणचे अधिकारी म्हणाले, योजना सुरु करण्यापूर्वी चाचणी घेण्यात आली नव्हती. इस्टिमेंटपेक्षा खर्च अधिक होत असल्याने ठेकेदार काम करत नाहीत. काही एजन्सींना आपण दंड देखील केला आहे. कोल्हे म्हणाले, जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करुन योजना लवकर योजना कार्यान्वित करा.

जलजीवनचे अधिकारी दोनदा निलंबित करा
जिल्ह्यातील जलजीवन योजनेसंदर्भात खा. लंके यांनी अधिकार्‍यांना धरेवर धरले. 2022 मध्ये जिल्ह्यातील 830 योजनांना मजुरी मिळाली होती. आता किती टक्के काम पूर्ण झाले आहे? यावर अधिकारी म्हणाले, 830 पैकी 274 योजना पूर्ण झाल्या आहेत. 556 योजना प्रगतीपथावर आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने डिसेंबर 2028 ची कालमर्यादा घालून दिली आहे. लंके म्हणाले, चार वर्षात तुम्हाला योजना पूर्ण करता आल्या नाहीत. आत दोन वर्षात योजना पूर्ण होतील का? तुमच्यातले काही अधिकारी दोनदा निलंबित केले पाहिजेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : जेवणाच्या ऑर्डरवरील वादातूनच खून

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी पसरत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत, पोलीस उपाधिक्षक जयदत्त भवर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत सविस्तर...