मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा झटका दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कारणे देत पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपोषणाची परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी परवानगी का नाकारली?
दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, न्यायपालिका, व्यवसाय आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच गेल्या वेळी झालेल्या आंदोलनादरम्यान सीएसएमटी आणि महानगरपालिका परिसर वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागल्याने नागरिकांची झालेली गैरसोय व ठरवून दिलेली ५ हजारांच्या मर्यादेपेक्षा अधिक लोक जमल्याचा दाखला पोलिसांनी दिला आहे.तर मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत असून गर्दीमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये बाधा येऊ नये, म्हणून परवानगी (Permission) नाकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील आक्रमक
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, पण सरकारने कायदा पायदळी तुडवला आहे. आम्ही अशा द्वेषपूर्ण नियमांशी बांधील नाही,” असे सांगत जरांगे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा इशारा दिला.
पाणी आणि औषधोपचार बंद, मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान सरकारच्या (Government) या भूमिकेच्या निषेधार्थ आणि आंदोलनावर ठाम राहत जरांगे यांनी आजपासून पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच मागील वर्षीही गणेशोत्सवात शांततेत आंदोलन (Protest) केले होते, असे सांगत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य अस्थिर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ही हुकूमशाही नसून गुंडगिरी आहे, असे ते म्हणाले.
पुढील कायदेशीर लढा
पोलिसांच्या या निर्णयाविरोधात जरांगे पाटलांचे वकील कायदेशीर पावले उचलणार आहेत. पोलीस आयुक्तांकडे दाद मागायची की न्यायालयात धाव घ्यायची, याचा निर्णय कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला जाईल. “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच लढा देऊ,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. ऐन गणेशोत्सवात उपोषण आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.




