
मुंबई | Mumbai
राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (Special Intensive Revision – SIR) अंतर्गत महाराष्ट्राची (Maharashtra) नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या नव्या यादीतून राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजारांहून अधिक मतदारांची (Voter) नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. घरोघरी पडताळणीदरम्यान गणना प्रपत्र न मिळणे, गैरहजेरी, स्थलांतर, मृत्यू आणि दुबार नोंदणी यांसारख्या कारणांमुळे ही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
आकडेवारी एका नजरेत
पूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ नोंदणीकृत मतदार होते. नव्या प्रारुप यादीत ७,७१,६५,५६२ (७८.८६%) मतदारांचाच समावेश करण्यात आला असून, २,०६,८८,४८७ (२१.१४%) मतदारांची नावे सध्याच्या यादीत आलेली नाहीत. दरम्यान नव्या प्रारूप मतदार यादीत ३,९५,८९,९०५ पुरुष आणि ३,७५,७२,५७० महिलांचा (Women) समावेश आहे. तर
तृतीयपंथी ३,०८७ मतदार आहेत.
नाव कसे तपासावे?
मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या पोर्टलला अथवा राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO Maharashtra) अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘प्रारुप मतदार यादी २०२६’ मध्ये आपले नाव तपासावे.
नाव गायब असल्यास काय करावे?
- नाव यादीत नसल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. निवडणूक आयोगाने यासाठी विशेष दुरुस्ती कालावधी दिला आहे
- नवीन नाव नोंदणीसाठी (फॉर्म ६) : यादीत नाव नसल्यास किंवा १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी फॉर्म ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.
- अपात्र नावावर हरकत घेण्यास (फॉर्म ७): अपात्र व्यक्तीचे नाव यादीत आढळल्यास फॉर्म ७ भरावा.
- दुरुस्ती व पत्ता बदलासाठी (फॉर्म ८): नाव, पत्ता किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म ८ चा वापर करावा.
दावे व हरकतींचे वेळापत्रक
- दावे व हरकती नोंदवण्याची मुदत: ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६
- अर्जांची छाननी व निस्तारण : २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
- अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ४ नोव्हेंबर २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
- या पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातील मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे.
- पूर्वी राज्यात १,००,२५३ केंद्रे होती. त्यातील ४३१ केंद्रे कमी करून आणि ३९४ नवीन केंद्रे जोडून आता एकूण १,००,२१६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
- मतदारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी १,४०३ मतदान केंद्रांचे स्थळ बदलून त्यांना पक्क्या व सुरक्षित इमारतींमध्ये हलवण्यात आले आहे.
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी आपले नाव आणि मतदान केंद्र तपासून घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.




