मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली असून, ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे तब्बल सहा खासदार आपल्या गळाला लावल्याचे खात्रीलायक वृत्त असून, यातील काही खासदार राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गोटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.
एककीडे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांनीच केलेल्या काही दाव्यांमुळे या सर्व प्रकरणाबाबत अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. राऊत यांनी काल रात्री केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की, “महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स देण्यात येत आहे.” या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असतानाच, आज त्यांनी आणखी एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे.
संजय राऊत यांनी नांदेड विमानतळावरील एका चार्टर्ड विमानाचा फोटो पोस्ट करत थेट आपल्याच खासदारांना विमानातून उचलून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरते आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते. ज्यांची कधी काळी रिक्षात फिरण्याची औकात नव्हती, आज त्यांची खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ‘ठाकरेनामा’मुळे वाढली आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळवीला टायगर का म्हणता?” राऊत यांच्या या संतप्त सवालानंतर आता ‘ऑपरेशन टायगर’ खरोखरच सुरू झाल्याचे खुद्द त्यांनीच अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गोटात सामील होणाऱ्या संभाव्य खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई हे देखील तातडीने दिल्लीला पोहोचले आहेत. शिंदे यांनी लावलेल्या या तगड्या फिल्डिंगला रोखण्यासाठी आता ठाकरे सेना नेमकी काय कायदेशीर किंवा राजकीय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकारणातील हा ‘टायगर’ नेमकी कुणाची शिकार करणार, हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.




