Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Political : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार; काँग्रेस आणि ठाकरे...

Maharashtra Political : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार; काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार फुटणार?

शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

मुंबई | Mumbai

माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी ‘एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्यादृष्टीने संपलेली आहे, त्यामुळे नवा ‘उदय’ होईल’, असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे (Former MP Rahul Shewale) यांनी माध्यमांशी बोलतांना वडेट्टीवार आणि राऊत यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत मोठा दावा केला आहे.

- Advertisement -

यावेळी शेवाळे म्हणाले की, “विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या पसरवत आहेत. काँग्रेस आणि उबाठाचे काही आमदार (MLA) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यांची संख्या १५ आणि १० इतकी आहे. कुठे ना कुठे आपला पक्ष फुटू शकतो असे त्यांना वाटते. दुसऱ्याच्या उदयापेक्षा तुमच्या अस्ताची काळजी घ्या. पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून २३ जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार त्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जातात. उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. केंद्रातही राजकीय भूकंप होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून या घडामोडी सुरू आहेत. त्याची कुठेतरी चाहूल लागल्यामुळे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार पक्षाच्या अस्ताला वाचवण्यासाठी अशी विधाने करत आहेत”, असा आरोप त्यांनी केला

पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi) अस्वस्थता दिसून येत आहे. ही आघाडी स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी झाली आहे. ज्याठिकाणी स्वार्थ निघून जातो, हातातील सत्ता जाते आणि पुढची महत्त्वाकांक्षा दिसून येत नाही तिथेच बिघाडी दिसते. स्वत:चे राजकीय (Political) अस्तित्व आणि पक्षाला वाचवण्यासाठी काही जण हातपाय पसरत आहेत असा टोलाही यावेळी राहुल शेवाळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले होते की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत २० आमदार होते. राज्यात महायुतीचे सरकार आले, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?

उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल. कारण काही ‘उदय’ दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच… उद्धवजींना संपविण्यासाठी शिंदे पुढे आले. आता शिंदे यांना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या