मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला (Gram Sevak) कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर टाकला होता. त्यामुळे मंत्री बोर्डीकर अडचणीत सापडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या (Parbhani) जिंतूर तालुक्यातील (Jintur Taluka) बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्कल मधील १७ ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री ग्राम आवास योजना टप्पा दोन अंतर्गत, लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृह प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर गटविकास अधिकारी सुभाष मानकर नायब तहसीलदार प्रशांत राखी ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी हे प्रमुख उपस्थित होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Video), “याद राख ही मेघना बोर्डीकर आहे. तुला पगार कोण देतंय? माझ्यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही. तू या गावात काय कारभार करतोस, हे मला माहित आहे. असा वागला तर कानाखाली वाजवीन. तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन. त्यामुळेच मी या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांनाही बोलावले आहे. हमाली करायची तर सोडून दे नोकरी”, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणताना दिसत आहेत .
बोर्डीकरांनी दिले स्पष्टीकरण
रोहित पवार यांनी अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल केली आहे. हा ग्रामसेवक विधवा महिलांना पैसे मागून त्यांना ग्रामपंचातींमध्ये लुडबुड करणाऱ्या एका नेत्याकडे पाठवून त्यांचा छळ करीत होता. मग त्याची पूजा करायची का? अशा लोकांमुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नसतील तर काय कामाच्या? हा माझा त्रागा होता. आमदाराशी नीट वाग, नाहीतर कानाखाली वाजवीन असे पोलीस अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला शिकवू नये, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटले.
रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ” सभागृहात रमी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडे काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे यांच्यामध्ये आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्यांची भर पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.





