नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे रविवार (दि.०६) रोजी बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या हस्ते बारामती येथील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्धाटन पार पडले. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री (DCM) अजित पवार हे नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन स्वीकारत हते.त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना देखील करत होते. मात्र, त्याचवेळी एका कार्यकर्त्याने आपली कामे झाली नसल्याचे सांगितले. त्यासोबत आणखी इतर नागरिकांनी देखील आपली कैफियत मांडली. त्यावर अजित पवार यांनी संतापून “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केले का?”, असे म्हटले होते. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अजित पवारांचे कान टोचले आहेत.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे बोलायला नको होते. जनता हीच देशाची मालक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील सर्वसामान्य लोकांना देशाचे मालक बनवले. राज्यघटनेच्या माध्यमातून जनता हीच भारताची मालक असेल, अशी मांडणी बाबासाहेबांनी केली, असा दाखला देत भुजबळ यांनी अजित पवार यांचे विधान त्यांना पटले नसल्याचे म्हटले. त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, दुसरीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पदावर राहू नये,त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर पुण्यातील सभेत अजित पवारांवर केलेल्या टीकेवर सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.