बारामती | Baramati
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी आज (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. यानंतर आता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी केले जाणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवारी) बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव रात्री १० वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
यानंतर उद्या (गुरुवारी) सकाळी सहा ते पावणे नऊ यावेळेत त्यांच्या मुळगावी काटेवाडी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्यानंतर सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. तर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील. अंत्यसंस्कारावेळी अजित पवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : … अन् ‘त्याच’ घड्याळामुळे पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख; महाराष्ट्राच्या ‘दादा’ची चटका लावणारी एक्झिट
दरम्यान, अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामतीमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी केली जात असताना दुसरीकडे अजित पवारांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानाशेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहे.




