Thursday, January 29, 2026
Homeमुख्य बातम्याAjit Pawar Death : शब्दाचा पक्का, कामाचा झंझावात; महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'अजितपर्व'...

Ajit Pawar Death : शब्दाचा पक्का, कामाचा झंझावात; महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘अजितपर्व’ हरपलं! मंत्री भुजबळांची मन सुन्न करणारी पोस्ट

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी आज (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

YouTube video player

अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : … अन् ‘त्याच’ घड्याळामुळे पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख; महाराष्ट्राच्या ‘दादा’ची चटका लावणारी एक्झिट

भुजबळांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

अत्यंत धक्कादायक… मन सुन्न करणारी आणि कदापि विश्वास न बसणारी ही बातमी आहे. बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि पायाखालची जमीनच सरकली. नियती इतकी क्रूर असू शकते, याचा विचारही कधी केला नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं ‘अजितपर्व’ अशा प्रकारे अकाली शांत होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने आज हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आली असून,व्यक्तिगत मला स्वतःला देखील या धक्क्यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे.

हे देखील वाचा :  Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या लाडक्या ‘दादा’ला उद्या अखेरचा निरोप; शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार

अजितदादा आणि माझे नाते केवळ राजकीय सहकाऱ्यांचे नव्हते, तर ते त्या पलीकडचे होते. सन १९९९ मध्ये जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादांचा तो स्पष्टवक्ता स्वभाव आणि “कामाचं बोला” म्हणण्याची त्यांची आग्रही पद्धत प्रशासनाला शिस्त लावणारी होती. दादांच्या कार्यशैलीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असायची. ते रोज पहाटे ५ वाजता उठून कामाला लागत असत. सूर्योदयाच्या वेळी जेव्हा जग जागे होत असते, तेव्हा दादांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असायची. सकाळी लवकरात लवकर जनतेच्या सेवेत हजर होणे आणि लोकांचे प्रश्न जागेवर निकाली काढणे, हा त्यांचा शिरस्ता होता. अशा कार्यतत्पर आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याचे जाणे ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे.

शरद पवार साहेबांसारख्या मात्तब्बर नेत्याच्या मुशीत तयार झालेल्या अजितदादांचा स्व:ताचा असा कार्यलौकीक आहे. शरद पवार साहेब हे लोकसभेत असताना संपुर्ण बारामती आणि महाराष्ट्राची जबाबदारी दादांनी संभाळली. दादांच्या विकासकामांवर बारामतीच्या जनतेने विश्वास ठेवला आणि बारामती मतदारसंघातून विधानसभेवर  १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०१९,२०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते पवार साहेबांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. त्यानंतर आमच्या आघाडीचे सरकार असताना म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे व सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दादा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता महायुती सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री पदी काम करत होते. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा सपाटा सुरु केला होता.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकांना दादांची कडक शिस्त आणि दरारा माहिती होता, पण मी दादांचा हळवा आणि संवेदनशील स्वभाव जवळून पाहिला आहे. २०१४ नंतरच्या काळात जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग ओढवला होता, तेव्हा दादांनी वेळोवेळी दिलेला धीर आणि भुजबळ कुटुंबाच्या पाठीशी उभी केलेली ताकद मी कधीही विसरू शकणार नाही. अगदी गेल्या वर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची प्रचंड धावपळ सुरू असताना, केवळ माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादा आवर्जून थेट नाशिकला आले होते. कामाचा एवढा व्याप असतानाही नात्यातील ओलावा जपणारा असा हा दिलदार माणूस होता. मतभेद अनेकदा झाले असतील, पण मनात कधीही कटुता न ठेवता माझ्या ज्येष्ठत्वाचा त्यांनी कायम सन्मान केला.दादांचा स्वभाव हा अतिशय सरळमार्गी आणि मनमोकळा. प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या दादांचा जनसामान्यांमध्ये मोठा नावलौकीक होता. त्यांच्य़ा स्पष्टोक्ते पणाची देखील नेहमीच चर्चा होत असते काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष, पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे अशी अजित पवारांची ख्याती होती.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारपुढे अनेक संकटे आली पण सर्वात मोठं संकट हे कोरोनाचे होते.त्याच बरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रिवादळ, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली पण मुळातच जनतेचे कल्याण या उदिष्ठाने एकत्र आलेल्या आमच्या सरकारने सर्व संकटांशी दोन हाथ केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू रहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करताना अजित पवार यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले. कोरोनाचा मुकाबला करताना राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद  केली यामुळेच आपण राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यसाठी सक्षम यंत्रणा तयार करू शकलो.

हे देखील वाचा : Ajit Pawar Political Journey : सहकारातून कारकि‍र्दीला सुरुवात ते खासदार, आमदार आणि उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम; अशी होती अजित पवारांची राजकीय वाटचाल

करोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याने आर्थिक वर्षात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वितरित करताना नाशिक जिल्ह्यासाठी हात काहीसा सैल सोडला आणि नाशिक जिल्ह्याला भरघोस निधी दिला.. शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मोफत शिवभोजन थाळीचा निर्णय तर सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा होता. यासाठी देखील अजित पवार यांनी भरघोस निधी देण्याची तयारी दाखवली. एखादा लोककल्याणकारी काम जर दादांना सुचले तर त्या कामाला पुर्णत्वास नेल्याशिवाय शांत बसत नाहीत याचा मला अनुभव आहे. अजितदादा राज्याचे ऊर्जामंत्री असताना, महावितरणमध्ये ‘लाईन वूमन’ म्हणून महिलांना संधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भरती केलेल्या मुली, लाईनवूमन म्हणून आज मुलांपेक्षाही चांगलं काम करत आहेत.

अजितदादा हे केवळ एका भागाचे नेते नव्हते, तर सर्वसमावेशक विचार करणारे नेतृत्व होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी ११ वेळा अर्थसंकल्प मांडून महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनाला नवी दिशा दिली. आधुनिक पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे शिल्पकार होते. मंत्रिमंडळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असो किंवा बहुजन समाजाच्या विकासाचे प्रश्न, दादांनी नेहमीच अत्यंत ठाम भूमिका घेतली. प्रशासकीय गुंता सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा शब्द नेहमीच मैलाचा दगड ठरला. राजकारणात दादांची ओळख ‘शब्दाचा पक्का माणूस’ अशी होती, पण दादा, आज न सांगता अशा प्रकारे कायमची एक्झिट घेऊन तुम्ही मात्र तुमचा शब्द मोडलात आणि आम्हाला अर्ध्या वाटेवर पोरकं करून निघून गेलात. ‘पॉवरहाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या ऊर्जेची उणीव या राज्याला सदैव भासत राहील.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अजित पवार “दादा” नावाने ओळखले जाणारे हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि प्रत्येक सामान्य माणसाचे विशेष नेतृत्त्व होते. त्यांच्या कामाचे स्वरूप केवळ राजकीय शहाणपणापुरते सीमित नव्हते; ते लोकांच्या दुःखांमध्ये सामील होऊन सोबत चालले.त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले निर्णय, आर्थिक नियोजनातले दूरदर्शी विचार, आणि शासनाच्या विविध विभागांतील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याची त्यांची क्षमता हे सगळे आज महाराष्ट्राच्या जनमानसात शोक आणि अभिमान दोन्ही भावनिक तडाख्यांसह राहतील. कालच मंत्री मंडळ पूर्व बैठक व मंत्री मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने दिवसभर मी त्यांच्या सोबत होतो. यावेळी राज्यातील अनेक महत्वाच्या विषयांवर आमची चर्चा देखील झाली. मात्र आज अशी दुर्दैवी घटना घडली. आज माझ्यासाठी सर्वात कठीण आणि दु:खद प्रसंग  आहे. त्यामुळे निशब्द झालो आहे.पवार कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर आभाळाएवढा मोठा आहे. आदरणीय पवार साहेब, वहिनी आणि पार्थ-जय यांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली दादा! हा महाराष्ट्र तुम्हाला आणि तुमच्या धडाडीच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बारामतीत प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

ताज्या बातम्या

Crime News : ट्रान्सफॉर्मर देण्याच्या बहाण्याने 84.58 लाखांची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar क्रॉम्प्टन कंपनीचे डीलर असल्याचे भासवून एका कंपनीची तब्बल 84 लाख 58 हजार 430 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार येथील नागापूर एमआयडीसीत उघडकीस...