नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (NCP Ajit Pawar) असून या वाढदिवसाचे (Birthday) औचित्य साधून अजित पवार यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. यावेळी अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासह आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील (Delhi) राष्ट्रवादीचे कार्यालय (NCP Office) असलेल्या बलार्ड इस्टेट भागात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. ‘राजकारणातील सह्याद्री’ असा उल्लेख करून शरद पवार यांची कारकीर्द या पोस्टरवर लावण्यात आलेली आहे . त्याचबरोबर इतरही पोस्टर लावून शरद पवार यांच्या पक्षाकडून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे .
तसेच शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. याशिवाय शरद पवारांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला असून कॅप्शनमध्ये ‘गेली ६ दशकं ज्या धोरणी नेत्याच्या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राला-महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं त्या आदरणीय पवारसाहेबांचं अभिष्टचिंतन करूया #UntoldStoriesOfPawarSaheb ह्या गौरवकथांच्या माध्यमातून!’, असे लिहिण्यात आले आहे.
या भेटीमुळे कौटुंबिक मतभेद कमी होतील?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर टोकाचे राजकीय मतभेद झाले. व्यक्तीगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. शरद पवार आणि अजित पवार हे नात्याने काका-पुतण्या आहेत. कौटुंबिक संबंध बिघडले. आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी थेट काकांच निवासस्थान गाठून त्यांना शुभेच्छा देणं ही एक चांगली सुरुवात आहे. या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय कटुता कमी होईल. भविष्यात मनभेद कमी होईल. लोकसभा निवडणुकीपासून ही राजकीय कटुता जास्त वाढली होती. कारण अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात थेट पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर विधानसभेला शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवाराला उतरवलं. आता वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याने दोन्ही नेते, पक्ष आणि कौटुंबिक मतभेद कमी होतील, अशी चर्चा आहे.
.